scorecardresearch

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल लांबविणारे चोरटे गजाआड ;चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच जप्त

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले.

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच जप्त करण्यात आले.
या प्रकरणी कुंदन रमेश शिंदे (वय २८, रा. कात्रज) आणि अजित गणेश पवार (वय २५, रा. पुणे स्टेशन परिसर) यांना अटक करण्यात आली. शिंदे, पवार सराईत चोरटे आहेत. यापूर्वी त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पुणे रेल्वे स्थानक तसेच परिसरातील पीएमपी थांब्यावर प्रवाशांकडील मोबाइल संच शिंदे आणि पवार यांनी लांबविले होते. प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणारे चोरटे पुणे स्टेशन परिसरातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी कादिर शेख आणि समीर पटेल यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत त्यांनी प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविल्याची कबुली दिली. तपासात दोघांकडून ६३ मोबाइल संच जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक विशाल मोहिते, गजानन सोनुने, किशोर वग्गू, संजय जाधव आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thieves steal mobile phones passengers pune station area mobile sets seized crime branch amy

ताज्या बातम्या