गृहोपयोगी वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर सोफा विक्रीची जाहिरात देणे, एकास चांगलेच महागात पडले. चोरट्याने सोफा खरेदीच्या बहाण्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून पाच लाख सहा हजार रुपये लांबविल्याचे समोर आले आहे.

याबाबत एकाने पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बाणेर रस्ता भागात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी संकेतस्थळावर जुन्या सोफा विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सोफा खरेदीचा बहाणा केला. सोफा खरेदीचा व्यवहार ७० हजार रुपयांमध्ये ठरला होता. त्यानंतर चोरट्याने त्यांना क्युआर कोड पाठविला आणि संबंधित कोड स्कॅन करण्यास केला. कोड स्कॅन केल्यानंतर चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून ५ लाख ६ हजार ६०० रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात नागरिकांनी खातरजमा करावी –

ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सायबर चोरट्यांकडून फस‌वणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात नागरिकांनी खातरजमा करणे गरजेचे असल्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.