कठोर निर्बंधामुळे गेले सात महिने नाटकावर पडलेला पडदा आज दूर होणार आहे. राज्य शासनाने २२ ऑक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देताच नाट्यसृष्टीतील हालचालींना वेग आला आहे. राज्यातील नाट्यगृह आजपासून खुली होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली.

“कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती पण जमून गेले. नाटक बघत असताना जशी घंटा वाजायची तशीच घंटा वाजवण्याचा प्रयत्न मी सर्वांच्यासाक्षीने केला आहे. सध्या ५० टक्के उपस्थितीची व्यवस्था आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे. कॉलेज, शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या नंतर अंदाज आम्ही बघत आहोत. सध्या सगळीकडे करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे परिस्थिती सुधारत आहे. त्याला धक्का लागून आपल्याकडून चुका होऊन तिसरी लाट येऊ नये ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. आम्हाला सरकार चालवताना हे बंद करा ते बंद करा असे अजिबात आवडत नाही. सगळ्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले.

“अर्थ विभागाची जबाबदारी जरी माझ्याकडे असली तरी मला मोठ्या प्रमाणात या करोनातून आरोग्य कसे नीट ठेवता येईल याचा विचार करावा लागतो. तिथे जास्त निधी द्यावा लागतो.  पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे. कलावंतांनी, निर्मात्यांनी खूप काही सहन केलं,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.