पुणे : गेल्या १५ वर्षांपासून घरगुती स्वरूपात फराळ आणि खाद्यपदार्थाची विक्री करत आहे. पण करोना काळात अनेकांच्या हातचे काम गेले. त्याबरोबरच आत्मविश्वासही डळमळीत झाला. त्या हातांना काम देऊन त्यांना पुन्हा उभे करण्याच्या निश्चयाने गेल्या वर्षीपासून फराळ व्यवसायाची व्याप्ती वाढवली. यंदा ३० महिलांना रोजगार दिला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी दिवाळी आनंदाची केली, ही भावना आहे गृहउद्योजक माधवी गायकवाड यांची.

घरगुती स्तरावर दिवाळी फराळ आणि खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या माधवी गायकवाड यांनी गेल्या वर्षीपासून व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. नंदाई फूड्स या नावाने आता त्यांचा गृहउद्योग खवय्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. माधवी गायकवाड म्हणाल्या, स्वयंपाक आणि खाद्यपदार्थाची कला माझ्या आईकडून मला मिळाली. सुरुवातीला केवळ माझ्या हातचे पदार्थ सगळय़ांना आवडतात म्हणून मी मागणीप्रमाणे पदार्थ करून देत असे. माझ्याकडून घेतले जाणारे पदार्थ आवडल्याने त्यांना मागणी वाढली. त्यामुळे मी दिवाळीच्या काळात २५ ते ५० किलो फराळ करून विकण्यापर्यंत व्यवसाय वाढवला. करोना महासाथीमध्ये माझ्या पतीचा व्यवसाय बंद होता. तसेच, इतर अनेकांच्या हाताला काम नव्हते. खाद्यपदार्थाना मागणी होती, मात्र दर्जा, चव याबाबत साशंकताही होती. त्या वेळी नियमित ग्राहकांची खाद्यपदार्थाची मागणी पूर्ण करण्यासाठी मी व्यवसायाची व्याप्ती वाढवली. १० महिलांना मदतीला घेतले. यंदा ३० महिलांची मदत घेतली. देशासह परदेशात हजारो किलो फराळ पोहोचवला. महासाथीच्या काळात व्यवसायाला अशी दिशा मिळाल्याने आता उत्साह दुणावला आहे. महिलांच्या हाताला काम आणि खवय्यांना रुची देणारा व्यवसाय उभा करण्याचा हुरूप मिळाला आहे. करोना काळात हाताचे काम गेल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. दर्जा आणि सातत्य यांमुळे आमच्या खाद्यपदार्थाना पसंतीची पावती मिळाली. वर्षभर दिवाळी फराळाचे पदार्थ तसेच मागणीप्रमाणे इतर सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या कामात कुटुंबाचे सहकार्य अत्यावश्यक आहे. पदार्थाचा दर्जा मी सांभाळत असले तरी जाहिरात, विक्री या आघाडीवर माझे कुटुंब सक्रिय आहे. त्यामुळे माझ्या यशात त्यांचा वाटा मोठा आहे, असेही माधवी गायकवाड यांनी आवर्जून नमूद केले.