दिवाळीत शहरात लुटमारीच्या घटना घडल्या. बुधवार पेठेत एका तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला. चंदननगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन साडेतीन हजारांची रोकड लुटण्यात आली. नरेंद्र बुद्धीसिंह (वय २७, रा. साडेसतरानळी, हडपसर) याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नरेंद्र आणि त्याचा मित्र पहाटे चारच्या सुमारास बुधवार पेठ परिसरातून जात होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी दोघांना अडवले. चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी ढकलून दिल्या. एका मोटारीच्या काचेवर दगड मारला. त्यामुळे नरेंद्र आणि त्याच्याबरोबर असलेला मित्र घाबरला. चोरट्यांनी नरेंद्र आणि मित्राला मारहाण करुन १५ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

हेही वाचा : आधी ठेकेदारांचे म्हणणे ऐका नंतर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे पुणे महापालिकेला आदेश

दरम्यान, चंदननगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी विजय भास्कर गायकवाड (वय २१), विकास रमेश गायकवाड (वय २५, दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मध्यरात्री एकच्या सुमारास वडगाव शेरी भागातून निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी सिगारेट मागण्याच्या बहाण्याने त्यांना अडवले. त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.