पुणे : बारामतीत विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर बारामतीत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. पवार कुटुंबीयांसह संपूर्ण बारामतीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ नेते शरद यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ‘हा निव्वळ अपघात असून, यात राजकारण नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माध्यमांशी बोलताना शरद पवार भावूक झाले.

ते म्हणाले,‘अजित पवारांचे जाणे हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तुत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती आहे, अशा व्यक्तीला आज महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात, असे नसते. या अपघाताच्या मागे राजकारण आहे, अशी भूमिका काहींनी मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे.’

‘या अपघाताच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना सतत बसत आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,’ अशी भावनिक सादही त्यांनी घातली.

बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारत येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनीही शरद पवार, सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले.