पुणे : वाक्य पूर्ण झाल्यावर आपण पूर्णविराम वापरतो. त्यासह स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह अशा पाच चिन्हांना विरामचिन्हे असे म्हटले जाते. विरामचिन्हांच्या माध्यमातून थाॅमस कँडी या इंग्रजी अधिकाऱ्याने मराठी भाषेला सौष्ठव प्राप्त करून दिले. ही विरामचिन्हे वापरण्याची सुरुवात झाली त्याला पावणेदोनशे वर्षे झाली. तर विरामचिन्हांचे जनक थॉमस कँडी यांचे दीडशेवे स्मृती वर्ष सुरू झाले. विरामचिन्हांच्या वापरापूर्वी मराठीमध्ये वाक्य संपल्याची खूण म्हणून दंड म्हणजे उभी रेष वापरली जात असे.
मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना विरामचिन्हे बहाल करणाऱ्या थॉमस कँडी यांचे स्मरण करणे उचित ठरते. केवळ विरामचिन्हांचे जनक एवढ्याच उपाधीवर न थांबता मराठी शब्दकोश, व्याकरण, लेखन, संपादन आणि भाषांतर अशा सर्वच क्षेत्रांत काम करून मराठीला योगदान देणाऱ्या थाॅमस कँडी यांचे दीडशेवे स्मृती वर्ष २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले. हे ध्यानात घेता २६ फेब्रुवारी हा ‘विरामचिन्हे दिवस’ म्हणून साजरा करण्याची परंपरा रूजवावी, असे आवाहन ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले आहे.
मराठीमध्ये विरामचिन्हांची खऱ्या अर्थाने सुरुवात ही कँडी यांनी केली असे मानले जाते. त्यांनी लिहिलेली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही छोटी पुस्तिका १८५० मध्ये प्रकाशित झाली त्याला आता १७५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे २६ फेब्रुवारी हा कँडी यांचा स्मृतीदिवस या वर्षी आणि यापुढे दरवर्षी मराठी भाषकांनी ‘विरामचिन्हे दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन विविध साहित्य संस्था, विविध विद्यापीठांच्या मराठी विभागांसह शाळा-महाविद्यालयांना करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस आणि २८ फेब्रुवारी हा भारतीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर यापुढे २६ फेब्रुवारी हा मराठी विरामचिन्हे दिवस साजरा करण्याची परंपरा रूजवणे औचित्याचे होईल, याकडे शिरसाठ यांनी लक्ष वेधले.
कँडी यांनी विरामचिन्हे बहाल करण्यापूर्वी मराठीमध्येही हिंदीप्रमाणे वाक्य पूर्ण झाल्याची खूण म्हणून दंड (उभी रेष) वापरला जात होता. महानुभाव साहित्यामध्ये ती खूण म्हणून विसर्ग वापरला जात असे.
केवळ विरामचिन्हे बहाल करून कँडी थांबले नाहीत. तर, त्यांचा वापर कसा करावयाचा यासंदर्भात त्यांनी ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही पुस्तिकादेखील लिहिली. माणूस केवळ लिहिताना, वाचताना नव्हे तर बोलतानाही विरामचिन्हांचा वापर करत असतो हे आपल्या ध्यानातही येत नाही. मराठी संशोधन केंद्राचे संचालक अ. का. प्रियोळकर यांनी १९५४ मध्ये कँडी यांच्या ‘विराचिन्हांची परिभाषा’ पुस्तिकेची नवी आवृत्ती प्रकाशित केली. इतकेच नव्हे तर, पवित्र धर्मघ्रंथ असलेल्या बायबलमध्ये विरामचिन्हांचा समावेश करता येऊ शकेल का या विषयावर त्या काळी चर्चा झाली होती, अशी माहिती शिरसाठ यांनी दिली. या कामासाठी डाॅ. नीळकंठ रथ यांनी प्रोत्साहन दिल्याचे शिरसाठ यांनी आवर्जून नमूद केले.
कोण होते थाॅमस कँडी?
थाॅमस कँडी यांना ७२ वर्षांचे आयुष्य लाभले. वयाच्या १६ व्या वर्षी ते सैनिक म्हणून भारतात आले. वयाच्या २२ व्या वर्षी मराठी-इंग्रजी शब्दकाेश करण्याच्या निमित्ताने ते मोल्सवर्थ यांच्याशी जोडले गेले. त्यानंतर पुढील ५० वर्षे महाराष्ट्रात राहून शब्दकोश, भाषांतर, मराठी लेखन-संपादन, व्याकरण यासंदर्भात ते कार्यरत राहिले. महाबळेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला. तेथेच त्यांचे दफन करण्यात आले.
असे होणार कँडी यांचे दीडशेवे स्मृतीवर्ष
ज्येष्ठ प्रकाशक आणि ‘शुभदा सारस्वत प्रकाशन’चे संचालक शरद गोगटे हे थाॅमस कँडी यांच्यावर चरित्रात्मक कादंबरी तर, प्र. शि. नेरूरकर हे कँडी यांचे चरित्रलेखन करत आहेत. दीडशेव्या स्मृती वर्षांत या दोन्ही कलाकृती वाचकांच्या हाती येतील.

