डिटोनेटर आणि स्फोटकसदृश पावडरचे पाकीटही पाठविले
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया(एफटीआयआय) या संस्थेत प्रवेश दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देणारे पत्र संस्थेचे नवनियुक्त संचालक भूपेन कँथोला यांना पाठविण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला. या पत्रात स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर आणि पावडर देखील सापडली असून बाँबशोधक पथकाकडून त्याची तपासणी करण्यात आली आहे.
एफटीआयआयचे नवनियुक्त संचालक भुपेन कँथोला यांच्या कार्यालयात शनिवारी अज्ञात व्यक्तीने हे पत्र पाठविले. ते उघडल्यानंतर त्या पत्रात कन्हैयाकुमारला एफटीआयमध्ये येण्यास मनाई करावी, असा धमकाविणारा मजकूर लिहिण्यात आला होता, तसेच पत्राच्या पाकिटात डिटोनेटर आणि स्फोटकसदृश पावडरही होती. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी संस्थेत धाव घेतली, तसेच बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे. माजी संचालक प्रशांत पाठराबे यांच्या नावाने हे पत्र पाठविण्यात आले आहे.