पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणी आणि तिच्या पतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी अन्वर मकबूल पठाण (वय ३२, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पठाण याच्या विरुद्ध विनयभंग, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणीचे विवाहापूर्वी आरोपी अन्वर पठाणशी प्रेमसंबंध होते. तरुणीने विवाह केल्यानंतर आरोपी पठाण तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता.
आरोपी तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावत होता. तरुणीने नकार दिल्यानंतर पठाणने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला नकार दिल्याने पठाण चिडला. तरुणी आणि तिच्या पतीवर ॲसिड फेकून जीवे मारण्याची धमकी पठाणने दिली. तरुणी घरी एकटी हाेती. तेव्हा पठाण तिच्या घरात शिरला. त्याने तिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.