पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाच बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गांवरून दररोज सात हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असून, तीन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जलद आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासी संख्या वाढत आहे. गर्दीच्या वेळी काही मार्गांवर दर दीड ते दोन मिनिटांनी एक बस धावत असल्याचा दावा महापालिकेने आयटीडीपी इंडिया संस्थेच्या सर्वेक्षण अहवालाद्वारे केला आहे.

बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) या वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून निगडी-दापोडी मार्ग ओळखला जातो. या मार्गावर दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर आणि कात्रज यांसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडतो. या मार्गावर पहाटे सहा ते सकाळी आठ या दोन तासांच्या काळात प्रत्येक तासाला किमान दोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात.

दिघी-आळंदी आणि सांगवी-किवळे या दोन्ही मार्गांवरदेखील गर्दीच्या वेळेस दर दोन ते अडीच मिनिटांनी एक बस धावते. तर, काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड या मार्गांवर इतर मार्गांच्या तुलनेत कमी प्रवासी प्रवास करीत आहेत. येथेही दर पाच ते सहा मिनिटांनी एक बस धावते. बीआरटी बस सरासरी प्रति तास ३० किलोमीटर या वेगाने धावते. हा वेग सामान्य वाहतुकीच्या तुलनेत दुप्पट आहे. बसने प्रवास करताना दहा किलोमीटर अंतरासाठी वीस मिनिटे लागतात. तर, सामान्य वाहतूक मार्गावर ५० मिनिटे लागतात. बसने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाचत असल्यामुळे ही सेवा लोकप्रिय ठरत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

फेऱ्या वाढविण्याचे नियोजन

‘बीआरटीचे नियोजन भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा अंदाज घेऊन करण्यात आले. बीआरटी मार्गावरील बससेवेची वारंवारिता वाढविण्यासाठी फेऱ्यांची संख्या पीएमपीच्या सहकार्याने आणखी वाढवता येतील का, या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्याचे नियोजन करण्यात येत आहे,’ असे सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी सांगितले.

शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढत असताना महापालिकेने बीआरटीमध्ये योग्य वेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात आमूलाग्र बदल घडला आहे. गर्दीच्या वेळी दर ९० सेकंदांनी एक बस धावते. त्यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होते.- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटीडीपी इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात वेग, परवडणारी किंमत आणि कमी गर्दी यामुळे बीआरटीला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. शहरातील ९६ टक्के लोकसंख्या बीआरटी बसथांब्यांच्या ५०० मीटर परिसरात राहते. त्यामुळे ही सेवा समावेशक आहे. निगडी-दापोडी मार्गावरील प्रवाशांमध्ये १८ ते २५ वयोगटातील प्रवाशांची संख्या ४७ टक्के आहे. बहुतांश प्रवाशांचे महिन्याचे उत्पन्न २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.- आदित्य राणे, आयटीडीपी इंडिया