पुणे : टायर फुटल्याने मोटारीची चार वाहनांना धडक बसली. प्रभात रस्त्यावरील रोहिणी भाटे चौकानजीक बुलडाणा अर्बन बँकेसमोर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वाहनांचे नुकसान आले असून तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना; नाट्यसंस्थांना अनुदान मिळण्याचा मार्ग खुला
प्रभात रस्त्यावरून विधी महाविद्यालय रस्त्याच्या दिशेने जाणारी कार बुलडाणा बँकेजवळ आल्यानंतर मोटारीचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या मोटारीची समोरून येणाऱ्या बुलेटला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. त्यानंतर मोटारीची दोन दुचाकींना धडक बसली. यातील एक दुचारीस्वार अपघातग्रस्त मोटार आणि रस्त्याच्या कडेला थांबलेली मोटार यामध्ये अडकला. या अपघातात दोन मोटार आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. अपघातात जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. डेक्कन पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.