इंदापूर : पुणे- सोलापूर महामार्गावर भिगवण येथे डाळजजवळ टेम्पो आणि मोटारीच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू, तर तीनजण जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आदिती अमर हातेकर (वय २५), त्यांचा मुलगा जय (वय दोन वर्षे, रा. सांगोला) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६० वर्षे, रा. सांगोला) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मोटारचालक चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०), स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४, रा. पाटस) आणि समृद्धी कबीरदास गेजगे (वय १० महिने, रा. पाटस) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार पुण्याकडे चालली होती. टायर पंक्चर झाल्याने टेम्पो महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोला पाठीमागून मोटारीची धडक बसली. त्यामध्ये तिघे जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. टेम्पो हा महामार्गावरील पुलावर उभा होता. पुलाच्या पाठीमागे सोलापूरकडून पुण्याला जाताना तीव्र उतार आहे. या उतारावरून नेहमी वाहने वेगाने जात असतात. या अपघातात टेम्पोला मोटारीची पाठिमागून धडक बसल्याने मोटारीचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, भिगवण पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जखमींना भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे तपास करत आहेत.

