पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पौड रस्ता, बालेवाडी, नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.पौड रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब लक्ष्मण तनपुरे (वय ६५, रा. लक्ष्मण व्हिला अपार्टमेंट, पौड रस्ता, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत अमित तनपुरे (वय ३९) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब तनपुरे हे गेल्या महिन्यात पौड रस्त्यावरुन निघाले होते. सुश्रृत हाॅस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या तनपुरे यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातात तनपुरे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. अडागळे तपास करत आहेत.

बालेवाडी परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असून, त्याची ओळख पटलेली नाही. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास तरुण बालेवाडी परिसरातून निघाला होता. त्यावेळी भरधाव डंपरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पसार झालेल्या डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी सचिन बिरंगळ यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

हेही वाचा >>>श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन

नगर रस्त्यावरील पिंपरी सांडस गावाजवळ वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश मारुती वायकर (वय ५३, रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. वायकर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी जामदार वस्ती परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने वायकर यांना धडक दिली. अंधारात वाहनचालक पसार झाला. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.