पुणे : पारपत्र पडताळणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या सिंहगड पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस नाईक यशवंत सातव, अभय काळे, अमोल हिरवे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. सातव, काळे, हिरवे तिघेजण सिंहगड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तिघांवर पारपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. सिंहगड रस्ता भागातील एका नागरिकाने पारपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता. पारपत्र पडताळणीसाठी पाच हजार रुपयांची लाच तिघांनी मागितली होती. तक्रारदार नागरिकाने तिघांना तीन हजार रुपये दिले आणि याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयात दिली होती. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा  गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत पारपत्र पडताळणीची जबाबदारी सोपविण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यानंतर तिघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

पारपत्र पडताळणीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याची सूचना देण्यात आल्यानंतर तातडीने पडताळणी करण्यात येत आहे. पाच दिवसात पारपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, पडताळणीसाठी काही कर्मचारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.