पुणे : धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी तीन अमेरिकी नागरिकांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या बाबत प्रतीक प्रकाश बोबडे (वय २६, रा. नातूबाग, सदाशिव पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदखलपात्र गु्न्हा दाखल केलेले अमेरिकी नागरिक हे पर्यटन व्हिसावर २१ एप्रिल रोजी भारतात आले. २७ एप्रिल रोजी ते शुक्रवार पेठेत आले होते. फिर्यादी बोबडे तेथून निघाले होते. त्या वेळी तीन अमेरिकी नागरिकांनी त्यांना एक पत्रक दिले. या पत्रकावर हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत मजकूर होता. संबंधित मजकूर धर्मप्रसाराचा होता. संबंधित मजकूर वाचनात आल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार बोबडे यांनी पोलिसांकडे दिली.
‘बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमेरिकी नागरिकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे’, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. तीन अमेरिकी नागरिकांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पारपत्र नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तिघे पर्यटन व्हिसावर भारतात आले आहेत. – कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक
