पुणे : कर्करोग हा सर्वांत गंभीर आजार असल्याची भीती नागरिकांमध्ये असली, तरी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेतल्यास रुग्ण जगण्याचे प्रमाण व जीवनमान लक्षणीय सुधारू शकते. कर्करोग हा मृत्युदंड नाही, असे मत सह्याद्री रुग्णालयाचे मेडिकल ऑन्कोलाॅजिस्ट डाॅ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त (४ फेब्रुवारी) ‘युनायटेड बाय युनिक’ असा विषय ठरविण्यात आला असून, कर्करोगाविरुद्ध एकत्रित लढा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डाॅ. कुलकर्णी म्हणाले, ‘जगभरात दर वर्षी सुमारे दोन कोटी कर्करोगाचे रुग्ण आढळतात. त्यांपैकी एक कोटींहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. भारतात दर वर्षी १५ लाखांहून अधिक कर्करोगग्रस्तांची नोंद होत असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा वाढता आहे. यामध्ये स्तनाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा, गर्भाशयाचा आणि अन्ननलिका या कर्करोगांच्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे.

प्रामुख्याने शहरी भागात बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, तंबाखू आणि मद्यसेवन यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसते. ग्रामीण भागात जागृतीचा अभाव, तपासणी सुविधांचा अभाव अथवा विलंबाने उपचार, आर्थिक अडचणी आणि आरोग्यसेवांबाबत मर्यादित माहिती असल्याने हे रुग्ण प्राथमिक अवस्थेत उपचारासाठी येतात. तोपर्यंत रुग्णाच्या शरीरात कर्करोगाची लक्षणे पूर्णपणे पसरलेली असतात.

मात्र, या बदलत्या जीवनशैलीत आरोग्यापासून आहारापर्यंत लक्ष दिले, व्यसनांकडे दुर्लक्ष केले, तर कर्करोगापासून धोका टळू शकतो. त्याचबरोबर ज्यांना कर्करोग झाला आहे. कर्करोगाची लक्षणे वेळीच जाणली किंवा ज्यांना कर्करोग झाला आहे, अशा रुग्णांनी तातडीने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास नक्कीच कर्करोगावर मात करता येते. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संंशोधनाच्या बळावर कर्करोग बरा होऊ शकतो. होण्यापूर्वीची काळजी घेतल्यास टाळता येणेही शक्य आहे, असे डाॅ. कुलकर्णी यांनी नमूद केले.

कर्करोगाची लक्षणे आणि उपाय

अचानक वजन घटणे, गाठ लागणे, सतत वेदना, असामान्य रक्तस्राव, केसगळती, बऱ्या न होणाऱ्या जखमा किंवा दीर्घकाळचा खोकला ही कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात सामान्य आणि किरकोळ दुखणे असल्याचे समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळणे, मद्यसेवन मर्यादित ठेवणे, संतुलित आहार, व्यायाम, स्तन, गर्भाशय आणि तोंडाच्या नियमित तपासण्या करण्याचे महत्त्व डाॅ. कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.