पुणे : जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे २०२७साठीची जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये देशातील तीनच विद्यापीठांना स्थान मिळवता आले आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनच्या क्रमवारीत देशातील १५४ विद्यापीठांनी स्थान प्राप्त केले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा १५ विद्यापीठे वाढली आहेत. त्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने जागतिक पातळीवर २५४वे स्थान प्राप्त केले आहे. त्या खालोखाल सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसने ३२५ ते ३५०, शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेसने ४५१ ते ५००, जामिया मिलिया इस्लामिया आणि केआयआयटी युनिव्हर्सिटी यांनी ५०१ ते ५५० या गटात स्थान प्राप्त केले आहे. काही आयआयटी, एनआयटीसह नामांकित खासगी विद्यापीठे पहिल्या ५०० विद्यापीठांच्या बाहेर राहिल्याचे दिसून येते.
राज्यातील काही विद्यापीठांनी या क्रमवारीत स्थान प्राप्त केले आहे. त्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने ६०१ ते ६५० या गटात स्थान मिळवले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), अडाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या विद्यापीठांनी १००१ ते १२०० या गटात स्थान मिळवले आहे. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, एमआयटी एडीटी विद्यापीठ १४०१ ते १६०० या स्थानी आहे. २०२६च्या क्रमवारीच्या तुलनेत यंदाच्या क्रमवारीत काही विद्यापीठांचे स्थान उंचावले आहे, तर काहींची थोडीफार घसरण झाल्याचे दिसून येते.
ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानी
यंदा या क्रमवारीत ११८ देशांतील २२९७ विद्यापीठांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग ११व्या वर्षी जागतिक पातळीवर पहिले स्थान प्राप्त केले आहे. त्या खालोखाल द्वितीय स्थानी मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), प्रिन्स्टन विद्यापीट आणि स्टॅनफर्ड विद्यापीठ विभागून तिसऱ्या स्थानी आहे. अध्यापन, संशोधन पर्यावरण, संशोधन गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योग अशा विविध निकषांवर मूल्यमापन करून क्रमवारी तयार केली जाते.
