पुणे : ‘स्वरमंचावरून एखादा राग मी आळवतो, तेव्हा ती एक अमूर्त संकल्पना असते. तिला कोणताही लौकिक किंवा शब्दशः अर्थ नसतो; तो राग म्हणजे खुर्ची किंवा टेबल यांसारखी दृश्य वस्तू नसते. त्यामुळे संगीत हेही प्रतीकात्मकच आहे. संगीत विश्वातील वावरण्यामुळे प्रतीकात्मता ही आपल्या जगण्याचा जणू अविभाज्य भागच होऊन जाते’, असे मत प्रसिद्ध गायक टी. एम. कृष्णा यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कला आणि संस्कृती विभागाच्या संयोजिका आरती किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पलाश’ या उपक्रमात टी. एम. कृष्णा यांच्या ‘वी द पीपल ऑफ इंडिया – डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यानिमित्ताने राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. सुहास पळशीकर यांनी कृष्णा यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकामध्ये कृष्णा यांनी भारतीय तिरंगा, राष्ट्रगीत, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य, राजमुद्रेवरील अशोकस्तंभ आणि भारतीय संविधानाची उद्देशिका यांच्या सांस्कृतिक व वैचारिक गाभ्याचे विश्लेषण केले आहे.
कृष्णा म्हणाले, ‘मी संगीत विश्वातून आलो आहे, जे स्वतःच प्रतीकात्मकतेने नटलेले आहे; आणि याच वारशातून मला मानवी प्रतीकांविषयी सखोल ओढ वाटू लागली. मुळात प्रतीकांचे अस्तित्व कशासाठी? लेखक म्हणून जेव्हा तुम्ही लेखणी हातात घेता, तेव्हा असा प्रश्न मनात न आणता तुम्ही थेट विषयाच्या गाभ्यात शिरता. परंतु, अतिशय मूलभूत स्तरावर पाहिले तर माझे कर्म असलेले संगीत हे स्वतःच प्रतीकात्मक आहे. वास्तविक, कोणतीही कला हा एक ‘प्रतीकवाद’ असतो.’
‘प्रत्येक प्रतीक हे स्वयंभू आणि सामर्थ्यशाली असते; त्यांतील काही प्रतीके आपल्या मनावर ठळकपणे कोरली जातात, तर काही कदाचित सहज नजरेला पडत नाहीत, परंतु त्यांचे अस्तित्व चिरंतन असते. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद आपल्या अवतीभवती इतक्या वेळा येते की, अनेकदा आपण त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.
असंख्य पुलांवर ‘अशोक स्तंभ’ विराजमान असतो, महान सम्राटाच्या नावाने आपण रस्ते ओळखतो. त्याचप्रमाणे, आपल्या संविधानाची उद्देशिका ही आता राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी प्रतिष्ठेचा असा एक उत्कट उद्घोष बनली आहे की, सीएए आंदोलनांसारख्या संघर्षाच्या काळातही तिचे सामूहिक पारायण केले गेले,’ याकडे लक्ष वेधून कृष्णा म्हणाले, ‘ध्वज हे निश्चितच महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. तो केवळ तिरंगा नसून ‘चतुरंगा’ आहे.
ध्वजातील निळा रंग हा दलित समाजाचे सामर्थ्य, सविनय कायदेभंगाची वृत्ती आणि उपेक्षितांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. तो आपल्या निषेध आणि असहमती व्यक्त करण्याच्या मूलभूत अधिकाराचा एक बुलंद हुंकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विविध दलित संघटनांच्या चळवळीतूनच निळा रंग खऱ्या अर्थाने जनमानसात रूजला. तो जनसामान्यांच्या अस्मितेचा स्वर आहे. ध्वजाच्या मध्यभागी असलेले हे निळे ‘धम्मचक्र’च आपल्या समाजात आणि राज्यव्यवस्थेत न्याय प्रस्थापित होण्याची ग्वाही देते’, असेही कृष्णा यांनी नमूद केले.
संगीत आणि एकूणच कलाविश्वात कलाकारांनी ज्वलंत सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिका घेणे ही अत्यंत विरळ घटना आहे. हे केवळ कर्नाटक संगीतापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावरही हेच वास्तव आहे. स्वतःच्या कलेचे मर्म आणि त्यामागचे शास्त्र इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने मांडणे हे कृष्णा यांनी दक्षिण भारतीय संगीताच्या संदर्भात आधीच साध्य केले आहे. – डाॅ. सुहास पळशीकर, राज्यसास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक.
