सायकल वापराच्या प्रसारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी मोहीम

सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्यातील जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख हे महाविद्यालयीन तरुण काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणार आहेत.

सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्यातील जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख हे महाविद्यालयीन तरुण काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणार आहेत. त्यांच्या या मोहिमेला सोमवारी (२ डिसेंबर) दुपारी ४ वाजता श्रीनगर येथून सुरूवात झाली असून ती १ जानेवारीला संपणार आहे.
जयदीप मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतो तर संकेत व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेत आहे. या मोहिमेदरम्यान संकेत आणि जयदीप विविध राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत व त्यांना सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक वापरू नये याबाबतही जनजागृती करणार आहेत.
आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी हा सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने करू शकतो तर नागरिक, विद्यार्थी पाच-सहा किलोमीटरचा प्रवास सायकलने का करू शकत नाहीत, ही संकल्पना डोक्यात ठेवून संकेत आणि जयदीपने मोहिमेचे आयोजन केले आहे. ‘वाढते शहरीकरण आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणही वाढले आहे. शहरांमधील प्रदूषणाबरोबरच इंधनाचा वापर कमी व्हावा आणि शहरांचे आरोग्य सुधारावे यासाठी सायकल वापरणे हा एकमेव पर्याय आहे,’ असे मत संकेत आणि जयदीप यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: To enhance use of cycle 2 youths special campaign kashmir kanyakumari by bicycle