अत्याचारांना रोखण्यासाठी महिलांनी एकत्र यावे – नीला सत्यनारायण

‘अगदी छोटय़ा मुलीपासून ज्येष्ठ महिलेवरील अत्याचार करणाऱ्या या अपप्रवृत्तींना तोंड देण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ असे मत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनीव्यक्त केले.

‘अगदी छोटय़ा मुलीपासून ज्येष्ठ महिलेवरील अत्याचार करणाऱ्या अपप्रवृत्तींमध्ये वाढ होते आहे. या अपप्रवृत्तींना तोंड देण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आणि आपल्यातील आत्मविश्वास जागवण्याची गरज आहे,’ असे मत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या विभागीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभामध्ये मंगळवारी व्यक्त केले.
एसएनडीटी विद्यापीठातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय महोत्सवाचे उद्घाटन सत्यनारायण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मधुरा जोशी, उपप्रचार्य माधवी कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक नितीन प्रभू तेंडुलकर आदी उपस्थित होते.
या वेळी सत्यनारायण म्हणाल्या, ‘‘सध्या भ्रष्टाचार आणि स्त्रियांवरील अत्याचार या दोन समस्या देशाला भेडसावत आहेत. स्त्री ही शांती आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. मात्र, ती तेवढीच कणखरही आहे. स्त्री उत्तम नेतृत्व करू शकते. स्त्रियांवरील वाढणाऱ्या अत्याचाराच्या अपप्रवृत्तींना सामोरे जाण्यासाठी स्त्रियांनी आत्मविश्वास जागवण्याची गरज आहे. स्त्रियांनी जर एकजूट केली, तर कोणतीही अपप्रवृत्ती सामथ्र्यशाली ठरणार नाही. स्त्रीने स्वसंरक्षणासाठी नेहमी सज्ज असले पाहिजे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: To oppose oppression women should get together neela satyanarayan