पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी उद्या (१७ ऑगस्ट) अंतिम मुदत आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम ५ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, १८ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे.यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर राखीव जागांद्वारे (कोटा) आतापर्यंत ६ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. सोमवार सायंकाळपर्यंत एकूण ३७ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार १८९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून आले. आता दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंग‌ळवारी अंतिम मुदत आहे. दुसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रवेश जाहीर झालेल्या आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.