शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा आणि त्यातील घोळ या विषयावर विचार करण्यासाठी तसेच पुढील कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी रविवारी (९ जून) स्वयंसेवी संस्थांची महत्त्वाची बैठक होत असून ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य आणि खासदार वंदना चव्हाण यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.
विकास आराखडय़ात अनेक गंभीर चुका करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक उपयोगाची आरक्षणे मोठय़ा प्रमाणावर उठवण्यात आली आहेत. या बाबी पुणेकरांसमोर याव्यात आणि आराखडय़ाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने हरकती-सूचना द्याव्यात, यासाठी ‘पुणे बचाव कृती समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. समितीतर्फे रविवारी (९ जून) सकाळी दहा वाजता बीएमसीसी जवळील आयएमडीआर संस्थेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत नागरिकांना सोप्या भाषेत विकास आराखडा समजावून सांगण्यात येईल. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा-खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे, नगरसेवक प्रशांत बधे, तसेच अनिता बेनिंजर, विवेक वेलणकर, सुजित पटवर्धन, उज्ज्वल केसकर, शिवा मंत्री, सुहास कुलकर्णी, अमेय जगताप यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.