‘सुफियाना गाणे हा आरडाओरडा असू शकत नाही. ते खूप हळुवार आणि हृदयात उतरणारे असते. आजचे सूफी संगीत हा ब्रँड झाला आहे. त्याला केवळ सूफी गाणे म्हणतात, पण त्या संगीताची मूळ भावना त्यात उरलेली नाही,’ असे मत ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी व्यक्त केले.
‘पिफ’मध्ये सिंग यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते.
‘इतक्या वर्षांमध्ये आवाजाच्या गुणवत्तेत पुष्कळ फरक पडला आहे व डॉल्बी डिजिटल तंत्र आल्यामुळे ते गरजेचेही होते. पण संगीतातील सखोलता आणि कल्पकता हरवली आहे,’ असे सांगून सिंग म्हणाले, ‘गाण्यांवर संगीतकाराचा शिक्काच नाही. नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्र या सर्व संगीतकारांची स्वत:ची छाप त्यांच्या संगीतावर होती. मोठय़ा स्टुडिओमध्ये संगीतकार, गायक, वादक असे सगळे एकत्र मिळून केवळ सकाळपासून बसून एकाच मायक्रोफोनवर गाणे करीत. आता स्टुडिओ लहान झाले आणि तो एकत्रितपणाही राहिला नाही. गाण्याच्या मध्ये सोडलेल्या मोकळ्या जागेत हवे ते गा, वाजवा, असा प्रकार आहे. आठवडाभर तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये गाणे बनवले जाते. ज्यांना वाजवायला बोलवतात त्यांनाही गाणे कुठले ते माहीत नसते. पूर्वी ‘फीमेल सोलो’, ‘मेल सोलो’, युगुल गीत, दु:खी गाणे, भावाने गायलेले गाणे, बहिणीने गायलेले गाणे अशी अनेकविध प्रकारची गाणी केली जात. आता फक्त नाचासाठीचे गाणे राहिले आहे.’
घराघरात मुलांना गाणे शिकवायला हवे!
सिंग म्हणाले, ‘संगीत हा जीवनाचा आणि आत्म्याचा भाग आहे. आज संगीतात पडलेला दुष्काळ दूर करायचा असेल तर युरोपप्रमाणे देशातही शाळांमध्ये संगीत हा विषय असायला हवा. घराघरात लहानपणापासून मुलांना गाणे शिकवायला हवे. बंगालमध्ये, तसेच दक्षिण भारतात ते दिसते.’