स्वच्छतागृह-उपाहारगृह शेजारी-शेजारी

पीएमपीच्या नादुरुस्त गाडय़ांमध्ये ‘ती’ स्वच्छतागृहांची सुविधा पुन्हा सुरू करताना त्यामध्ये उपाहारगृह सुरू करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

महिलांसाठी योजना राबविताना प्रशासकीय दूरदृष्टीचा अभाव

पुणे : पीएमपीच्या नादुरुस्त गाडय़ांमध्ये ‘ती’ स्वच्छतागृहांची सुविधा पुन्हा सुरू करताना त्यामध्ये उपाहारगृह सुरू करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. चहा, कॉफी आणि शीतपेयांची विक्री करून स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च निघावा, असा प्रस्ताव  महापालिका प्रशासनाकडून महिला आणि बालकल्याण समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतागृह आणि उपाहारगृह शेजारी-शेजारी अशी परिस्थिती उद्धभवणार आहे. त्यामुळे महिलांसाठी योजना राबविताना प्रशासनाकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे अधोरेखित झाले आहे.

शहरामध्ये महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीच्या वापरात नसलेल्या गाडय़ांचे रूपांतर स्वच्छतागृहांमध्ये करण्यात आले आहे. शहराच्या विविध अकरा ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे. या प्रकारच्या स्वच्छतागृहांना ‘ती’ स्वच्छतागृह असे नाव देण्यात आले आहे. सॅनिटरी पॅड विल्हेवाट यंत्रणा, र्निजतुकीकरण द्रावण, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी अशा सुविधा येथे देण्यात आल्या आहेत. या सुविधेच्या देखभाल दुरुस्तीचे काम अकरा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर साराप्लास्ट या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीला महापालिकेकडून कोणताही मोबादला देण्यात आला नव्हता. कंपनीबरोबर करार करताना पाण्याच्या बाटल्यांची विक्री करून देखभाल दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सध्या कंपनीबरोबरच करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीअभावी स्वच्छतागृहेही बंद आहेत. त्यामुळे नव्याने करार करताना पाण्याच्या बाटल्यांबरोबरच चहा, कॉफी आणि शीतपेयांची विक्री करून त्याद्वारे मिळणारे उत्पन्नातून स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे.

साराप्लास्ट प्रा. लि. या कंपनीने अठरा हजार रुपये प्रती गाडी प्रति महिना असा कमी दर दिल्याने या कंपनीला देखभाल दुरुस्तीचे काम देण्याबाबतचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीपुढे ठेवण्यात आला आहे. स्वच्छतागृहांची सुविधा असलेल्या गाडीचे दोन भाग करण्यात येणार असून एका भागात स्वच्छतागृह आणि दुसऱ्या भागात उपाहारगृह सुरू करण्यात येणार आहे. तसेच जाहिरात, पे अ‍ॅण्ड यूज या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यात येणार असून देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका कंपनीला कोणताही मोबदला देणार नाही, असे या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांसाठी हा करार करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वच्छतागृहांची पाहणी केल्यानंतरच या प्रस्तावाला मान्यता देण्याची भूमिका महिला आणि बालकल्याण समितीने घेतली आहे.

फिरत्या स्वच्छतागृहांवर उधळपट्टी

करोना संसर्ग काळात दाट लोकवस्तीच्या भागातील संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने फिरती स्वच्छतागृहे भाडेकरारो घेतली होती.  त्यासाठी ३ हजार ४४७ रुपये मासिक दराने ५०० स्वच्छतागृहे भाडेकराराने घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. चार कंपन्यांकडून भाडेकराराने स्वच्छतागृहे घेण्यात आली होती. त्यांना सध्या पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या या कंपन्यांना ४८ लाखांची रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र करोना काळात भाडेकराराने घेतलेली फिरती स्वच्छतागृहे कुठे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचाला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Toilet restaurant next door ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या