मिठाईच्या आकर्षक वेष्टनातील पुडय़ांना दिवाळीआधी येणारी मोठी मागणी पुरवण्यासाठी खवा आणि मिठाई उत्पादकांकडे आता लगबग सुरू होत आहे. मिठाई आकर्षक दिसावी यासाठी त्यात अधिक खाद्यरंग वापरले जाऊ शकतात, त्यामुळे अशी भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ग्राहकांना केले असून उत्पादकांनीही मिठाईत ठरलेल्या मानकापेक्षा अधिक खाद्यरंग वापरू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, की मिठाईत १०० पीपीएमपेक्षा (पार्ट्स पर मिलियन) अधिक खाद्यरंग वापरला जाऊ नये. मिठाई चांगली दिसावी म्हणून काही उत्पादकांचा भडक रंग वापरण्याकडे कल असू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी अशी मिठाई घेणे टाळावे. मिठाईवर लावायला या दिवसांत चांदीचा वर्ख मोठय़ा प्रमाणावर वापरतात. हा वर्ख चांगल्या प्रतीचा हवा तसेच त्याची खरेदी बिलेही ठेवण्याची खबरदारी अन्न व्यावसायिकांनी घेणे आवश्यक आहे.
खवा व तत्सम दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट थंड तापमानातच ठेवणे गरजेचे असून ओलावा आणि पदार्थातील नैसर्गिक गोडीमुळे त्यावर बुरशी येऊ शकते किंवा जीवाणूंचीही वाढ होऊ शकते. तसेच खवा अस्वच्छ डब्यांमध्ये ठेवला गेला तरीही खाण्यास अयोग्य ठरू शकतो, असेही संगत यांनी सांगितले.
तपासणी मोहीम २ नोव्हेंबरपासून
दिवाळी तोंडावर आल्यामुळे आता फराळ बनवण्यासाठीच्या कच्च्या मालाची बाजारपेठ फुलली आहे. या पाश्र्वभूमीवर २ नोव्हेंबरपासून एफडीएकडून तपासणी मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘खवा, मिठाईसह रवा, मैदा, बेसन, कणीक (आटा), बेसन, तेल, तूप यांचेही नमुने घेतले जातील. उत्पादक, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते या तिन्ही पातळ्यावर तपासणी केली जाईल. परराज्यातून येणारा खवा (मावा) व स्पेशल बर्फी यावर नजर ठेवण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तयार केली आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट, रेल्वे स्थानक या ठिकाणी तसेच लक्झरी बस स्थानकांवर ही पथके काम करतील.’