scorecardresearch

पर्यटक कोंडीत ; लोणावळ्यात झुंबड , द्रुतगती मार्गासह पर्यटनस्थळावर वाहतूक कोंडी

कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे

पर्यटक कोंडीत ; लोणावळ्यात झुंबड , द्रुतगती मार्गासह पर्यटनस्थळावर वाहतूक कोंडी
( भुशी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी )

स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रविवारी लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली. भुशी धरण परिसरात वर्षाविहारासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटकांच्या मोटारींच्या रांगा दहा किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची वाहने कोंडीत अडकली. कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली.

मुंबईकडून येणाऱ्या मोटारचालकांना कोंडीत अडकावे लागले. खालापूर ते लोणावळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीतून वाट काढत पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्यानंतर फरियाज हॅाटेलपासून कुमार चौक, भुशी धरणापर्यंत मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. दहा ते बारा किलोमीटरचे अंतर कापणे अवघड झाले होते. भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. धरणाच्या परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यावर पर्यटकांना रोखण्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या भागात गेल्या महिन्यात अपघात घडला होता. मुंबईतील एक तरुण वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती.

टायगर पॅाईंट परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. या भागात धुक्याची चादर पसरली होती. लोकल गाड्यातून पुण्याहून पर्यटक दाखल झाले. लोणावळा रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यटक दुचाकीने लोणावळा परिसरात दाखल झाले होते. लोणावळा शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

द्रुतगती मार्गावरील सहा मार्गिका खुल्या
खंडाळा घाटक्षेत्रात द्रुतगती मार्गावर कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा बोगद्याजवळ थांबविली होती. अमृतांजन पुलापासून खंडाळा बोगद्याच्या पुढे द्रुतगती मार्गावरील सहा मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या. द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने दाखल झाल्याने कोंडी सोडविणे अवघड झाले होते. शनिवारपासून (१३ ऑगस्ट) द्रुतगती मार्गावर कोंडी होत आहे. पुढील तीन दिवस द्रुतगती मार्गावर कोंडी होणार असल्याने महामार्ग पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. घाटक्षेत्रातील वाहने बंद पडण्याच्या घटना घडत असल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या