स्थानिक संस्था कराविरोधातील (एलबीटी) व्यापाऱ्यांच्या ‘बंद’ मध्ये सहभागी न झालेल्या व्यापाऱ्यांना ‘शेलक्या’ शब्दांत विनंती करीत त्यांची दुकाने बंद करण्याचे चित्र बुधवारी संध्याकाळी जंगली महाराज रस्त्यावर पाहायला मिळाले.
स्वत:ला व्यापाऱ्यांच्या संघाचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या काहीजणांनी संध्याकाळच्या वेळेस जंगली महाराज रस्त्यावरील ब्रँडेड कपडय़ांचे आणि वस्तूंचे एक-एक दुकान ओळीने बंद करवले. दुकानात जाऊन तेथील व्यवस्थापकाशी किंवा मालकाशी ‘विनंती करतो’, असे म्हणत हुज्जत घालायची, जबरदस्तीने दुकानाला कुलूप ठोकायला लावायचे आणि दुकानावर एलबीटीच्या विरोधातील भित्तिपत्रक चिकटवायचे, अशा पद्धतीने ही ‘कारवाई’ चालली होती. ‘बंदमध्ये सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही कंटाळलो आहोत. हे लोक इतर व्यापाऱ्यांचा पैसा लुबाडून खात आहेत. आम्हाला लवकर निर्णय हवा असल्यामुळे आम्ही यांना बंद करायला निघालो,’ अशा भाषेत या जबरदस्तीचे व्यापारी प्रतिनिधींकडून समर्थन केले जात होते.
एका ब्रँडेड वस्तूंच्या दुकानातील व्यवस्थापकाने सांगितले, ‘व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला वेगळ्या शब्दांत ‘विनंती’ करून दुकान बंद करायला भाग पाडले. अशा प्रकाराविरोधात आम्ही पोलीस संरक्षण मागू शकतो, पण इतर ब्रँडेड वस्तूंच्या दुकानदारांनीही जबरदस्ती करणाऱ्यांविरोधात संरक्षण न मागता दुकान बंद ठेवणेच पसंत केले आहे. पुन्हा असाच प्रकार घडला तर मात्र संरक्षण मागणार आहोत.’
दुकाने जबरदस्तीने बंद करणाऱ्या व्यापारी प्रतिनिधींनी आपल्या दुचाकी गाडय़ा जंगली महाराज रस्त्याच्या फुटपाथवर लावल्या होत्या. वाहतूक नियंत्रक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या दुचाकी उचलण्याचा प्रयत्न करताच व्यापारी प्रतिनिधींनी त्यांनाही आपल्या विनंतीची झलक दाखवत पुढे पाठवले! ‘पुढे व्हा, पुढे नो पार्किंगमध्ये खूप गाडय़ा आहेत,’असा सल्लाही दिला.
दरम्यान, पेठांमधील काही किराणा मालाच्या दुकानदारांनी बुधवारी दुकाने अर्धवट उघडी ठेवली होती. मात्र, एलबीटी बंदचे कारण देऊन या दुकानांत दीडपट किमतीने माल विकला जात होता. गहू, डाळी, तांदूळ, साखर अशा दैनंदिन उपयोगाच्या मालाची विक्रीही चढय़ा भावाने केली जात होती, अशी तक्रार काही ग्राहकांनी केली.