पुणे : अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे अमोल झेंडे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे. दारुवाला पुलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चाैक (बुधवार चौक) दरम्यान गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक बंद करून बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गाने वळविण्यात येईल. वाहनचालाकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.