पिंपरी : मावळ परिसर तसेच पिंपरी – चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद केली. स्थिती पूर्ववत होईपर्यंत ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

आळंदी ते चाकण रोडवरील केळगाव बायपास पूल, चाकण पूल, नगरपरिषद पुलावर पाणी आल्याने या पुलावरून दोन्ही बाजूच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याकडून येणारी वाहनांनी देहूफाटा चौक डावीकडे वळून मोशी मार्गे इच्छितस्थळी जावे. चर्होली फाटा येथे उजवीकडे वळून पीसीएस चौक, मरकळ चौक, चाकण चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. चाकणकडून येणारी वाहतूक चाकण चौक – मरकळ चौक – पीसीएस चौकातून उजवीकडे वळून चर्होली फाटा मार्गे इच्छितस्थळी जाईल. तळेगाव तळे भरल्याने तळेगाव गावठाणाकडून सोमाटणे गावाकडे जाणारा रस्ता बंद केला असून, नागरिकांनी लिंब फाटा – तळेगाव खिंड – सोमाटणे फाटामार्गे जावे. तळेगाव दाभाडे येथे हिंदमाता भुयारी मार्गात पाणी भरल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी काका हलवाई चौक स्टेशन चौक मार्गे जावे. मरकळ ते शिक्रापूर रोडवरील मरकळ पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी मरकळ गावात डावीकडे वळून कोयाळी कमानीकडून शेलपिपळगाव – रसिका हॉटेल मार्गे इच्छितस्थळी जावे. चाकण – म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे – फलके वस्ती येथील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने फलके वस्ती ते मोई गावाकडे जाणारा रस्ता ड्रम लावून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; मोरया गोसावी गणपती मंदिर पाण्याखाली|Pimpri-Chinchwad

चाकण येथील चक्रधर रोड ते भुजबळ आळी रस्ता वाहतुकीस बंद आहे. हा रस्ता हा अंतर्गत असल्याने वाहतूक इतर अंतर्गत रस्त्याने वळविण्यात आली आहे. मोई गाव इंद्रायणी नदी पुलावर पाणी आल्याने मोई फाटा ते डायमंड चौक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ताथवडे येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणाहून कार तसेच दुचाकींना प्रवेश बंद करण्यात आला असून जड वाहनांकरीता प्रवेश चालू आहे. बिर्ला रुग्णालय ते रिव्हर व्ह्यू चौक वाहतुकीस बंद करण्यात आला असून नागरिकांनी बिर्ला चौकात उजवीकडे वळून बारणे कॉर्नर – तापकीर चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. रावेत येथे समीर लॉन्स भुयारी मार्गाजवळ सात फुट पाणी साचल्याने हा सेवा रस्ता तसेच समीर लॉन्स भुयारी मार्ग सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला असून नागरिकांनी मुंबई – बंगळुरू महामार्गाने इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा : पिंपरी : पवना धरण ७६ टक्के भरले

निगडीतील हेगडेवार पुलाकडून चिंचवड गावाकडे येणारी वाहतूक चित्तराव गणपती येथून येण्या – जाण्यास बंद केली असून नागरिकांनी पिंपरी गाव मार्गे भाटरनगर – चिंचवड गावात यावे आणि लिंकरोड भाटनगर मार्गे इच्छितस्थळी जावे. मोरया गोसावी मंदिर ते स्मशानभुमी जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. खराळवाडी समतल विलगकामध्ये पाणी साचल्याने पुणे- मुंबईकडे जाणारा समतल विलगक सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला असून नागरिकांनी सेवा रस्त्याने पिंपरी पूल मार्गे मुंबई बाजूने इच्छितस्थळी जावे. तसेच, मोरवाडी चौकातून डावीकडे वळून अजमेरा- नेहरुनगर- वल्लभनगर नाशिक फाटा – मार्गे पुणे बाजूकडे इच्छितस्थळी जावे. पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी येथे पांजरपोळसमोर पाणी आल्याने पांजरपोळ चौकाकडून भोसरीकडे जाणारी जड अवजड वाहने सोडून इतर वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. भोसरी ते पांजरपोळ चौक सर्व वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. या मार्गावरील वाहने स्पाईनरोड व इंद्रायणीनगर मार्गे ये-जा करतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.