पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक आणि महामार्ग पोलिसांनी विविध प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी वारजे येथील रोजरी शाळेसमोरील (मुंबई मार्गिका) पुलावर मालवाहू वाहन मुंबईच्या दिशेने जात असताना इंधन संपल्याने रस्त्यात बंद पडले. त्यामुळे दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यास यंत्रणेला यश आले.
मात्र, दररोज या-ना त्या कारणाने वाहतूक कोंडीची समस्या कायम असून या त्रासाला सामोरे जावेच लागत आहे. दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच मालवाहू वाहने शहराच्या हद्दींतून सर्रास प्रवेश करून सातारा किंवा मुंबईच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ होत आहेत. मात्र, दररोज वाहतुकीवर ताण पडत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता वारजे परिसरातील रोजरी शाळेसमोरील पुलावरून एक मालवाहू वाहन इंधन संपल्याने रस्त्यात बंद पडले. त्यामुळे नियमित वेळेत कार्यालय, आस्थापनांमध्ये जाणारे कर्मचारी, नोकरदारवर्ग, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, पाण्याचे टँकर हे सर्व वाहतूक कोंडीत अडकून पडले. स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन संबंधित मालवाहू वाहन बाजूला काढले. तोपर्यंत मागील बाजूस दीड ते दोन किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलावर एकेरी वाहतूक असल्याने तासन् तास ताटकळत थांबावे लागले. हळूहळू वाहने मार्गस्थ झाली.
परिस्थिती ‘जैसे थे’
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम हिंजवडी, कोथरूड, चांदणी चौक, वारजे, पाषाण, वडगाव, धायरी, नवले पूल आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिसून येत आहे. प्रामुख्याने सकाळी कार्यालयीन वेळेत पोहोचताना आणि सायंकाळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर या मार्गावर प्रचंड गर्दी असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग आणि वाहतूक पोलिसांनी नियोजन करून मालवाहू, अवजड वाहनांसाठी कालमर्यादा निश्चित केली. तसेच या वाहनांना ठिकठिकाणी बाह्य वळणाद्वारे मार्गस्थ करून देण्यासाठी थांबे निश्चित केले. सुरुवातीच्या काही दिवसांत याचा परिणाम दिसून आला. मात्र, या मार्गावरील परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.
दुभाजकावरून दुचाकी…
कामानिमित्त वेळेवर पोहोचण्यासाठी धरपकड करत निघालेले प्रवासी रस्त्यात दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहनचालकांना रस्त्यातच अडकडून पडावे लागले. मात्र, शेवटी असणाऱ्या दुचाकीस्वारांनी सेवा रस्त्यावर जाण्यासाठी दुभाजकावरून वाहन दामटले. यातील काही वाहने पडली, तर काही मार्गस्थ झाली.
महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सकाळी वारजे येथील पुलाजवळील मालवाहू वाहनातील इंधन संपल्याने ते रस्त्यातच बंद पडले. ही शहरी हद्दीतील घटना असली, तरी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून बाह्य वळणाद्वारे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, ऐन गर्दीच्या सुमारासच ही घटना घडल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते. – विक्रांत देशमुख, महामार्ग पोलीस अधीक्षक
