scorecardresearch

पुणे : वाहतूक समस्येने पुणेकरांचा श्वास कोंडला !

कोंडीमागील मूळ समस्या कोणती याबाबत सर्वच सरकारी विभाग आपापले काम चोख बजावत असल्याचा दावा करीत आहेत.

traffic congestion problem in Pune city
(संग्रहित छायाचित्र) ( Image – लोकसत्ता टीम )

संजय जाधव

पुण्यातील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. आधीच अरुंद रस्ते आणि त्यातच अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम, यामुळे तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. यामुळेच सर्वांत जास्त वाहतूक कोंडी असलेल्या जगभरातील शहरात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे पुणेकरांचा वाहन चालवण्याचा निम्मा वेळ वाहतूक कोंडीत जात आहे.

हेही वाचा >>> पुणे : कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूचे प्रकरणी राजू शेट्टींची राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात याचिका

वाहतूक कोंडीची पुण्यातील समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांचा कल खासगी वाहनाच्या वापराकडे आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढू लागल्याने ते दिवसेंदिवस अपुरे पडू लागले आहेत. यातच मागील काही वर्षांत मेट्रोसह इतर विकासकामे सुरू आहेत. काही वर्षांपासून सुरू असलेल्या या विकासकामांमुळे पुण्यातील अरुंद रस्ते चिंचोळे बनले आहेत. ‘लोकसत्ता’ने यामागील कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कोंडीमागील मूळ समस्या कोणती याबाबत सर्वच सरकारी विभाग आपापले काम चोख बजावत असल्याचा दावा करीत आहेत. आमच्यामुळे पुणेकरांची कोंडी सुसह्य होत आहे, असा दावा हे विभाग करतात. प्रत्यक्षात कोंडीमुक्त पुणे शहराबद्दल कोणीही बोलताना दिसत नाही. नवनवीन प्रकल्प उभारल्यास कोंडीतून सुटका होईल, असा भाबडा आशावाद यंत्रणा व्यक्त करतात. प्रत्यक्षात आधीपासून सुरू असलेली पीएमपीएमएल बस सेवा आणि आता सुरू झालेली मेट्रो सेवा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्षम पर्याय उभा करण्यात यशस्वी ठरलेल्या नाहीत.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! कोणतीही करवाढ नाही, महापालिकेचा ७ हजार १२८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

नुकतेच ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग २०२२’ जाहीर करण्यात आले. यात जगभरातील ५६ देशांतील ३८९ देशांचा समावेश आहे. या देशांतील वाहतूक कोंडीची पाहणी करून त्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील आघाडीच्या शहरांमध्ये पुण्याने सहावा क्रमांक मिळवला आहे. या यादीत भारतातील बंगळुरू दुसऱ्या स्थानी आहे. देशाची राजधानी दिल्ली ३४ व्या स्थानी, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ४७ व्या स्थानी आहे.

वाहतूक कोंडीची कारणे

– वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या

– शहरातील रस्ते अरुंद अन् चिंचोळे

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही

– पदपथ नसल्याने नागरिकांना रस्त्यातून चालावे लागणे

– वाहनचालकांना दहा किलोमीटरसाठी लागणारा वेळ

२०२१ : २६ मिनिटे १० सेकंद

२०२२ : २७ मिनिटे २० सेकंद

– सर्वाधिक कोंडी : सायंकाळी ६ ते ७

– ताशी वेग : १७ किलोमीटर

– वार्षिक कार्बन उत्सर्जन – प्रत्येक वाहनचालकाकडून १ हजार १ किलो

– वर्षाला वाहन चालवण्याचा सरासरी वेळ : २४९ तास

– वर्षाला वाहतूक कोंडीत जाणारा वेळ : १२१ तास

(स्रोत : टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 15:55 IST