पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. शनिवारी (१ फेब्रुवारी) सकाळी सातनंतर श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहर, तसेच उपनगरातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शनिवारी सकाळपासून या भागात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, तसेच अन्य वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक, टिळक चौकमार्गे स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चैाकमार्गे इच्छितस्थळी जावे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Story img Loader