पुणे : महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेतील श्री पुण्येश्वर मंदिर, तसेच येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिर परिसरात रविवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

‘कसबा पेठेतील श्री पुण्येश्वर मंदिर, तसेच येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी सहा ते रात्री उशिरा गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. कसबा पेठेतील अगरवाल तालीम रस्ता, तसेच पवळे चौक ते श्री पुण्येश्वर मंदिर दरम्यान असलेल्या रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात अले असून, या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेे’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

कसबा पेठेतील कुंभारवेस चौकातून फडके हौदाकडे जाणाऱ्या वाहनांनी कुंभारवेस चौक, गाडगीळ पुतळा, जिजामाता चौक, लाल महाल, गणेश रस्ता, फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जावे. सूर्या हाॅस्पिटल चौकातून अगरवाल तालीम रस्त्याने पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी जिजामाता चौक, गणेश रस्ता, फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिर चौकातून नगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृहाकडे जाणारी वाहतूक आवश्यकेनुसार वळविण्यात येणार आहे. तारकेश्वर चौकातून नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सादलबाबा दर्गा चौकातून उजवीकडे डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर चौकाकडे वळविण्या्त येणार आहे. तेथून वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. संगमवाडीतून तारकेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी डाॅ. आंबेडकर चौकातून इच्छितस्थळी जावे. चंद्रमा चौकातून तारकेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक डाॅ. आंबेडकर चौकातून वळविण्यात येणार आहे.

पाच हजारदुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई, एक कोटींचा दंड वसूल

‘ट्रिपल सीट’ दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने जाणे, तसेच कर्णकर्कश हाॅर्न अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या पाच दिवसात पोलिसांनी पाच हजार ३८० दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत बेशिस्त दुचाकीस्वारांकडून एक कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यत आला.

‘भरधाव दुचाकी चालविणे, वाहतूक नियम धुडाकाविण्यामुळे गंभीर अपघात होतात. विरुद्ध दिशेने जाणे, तसेच ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या चुकांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौकात वाहतूक नियम धुडकविणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. गेल्या पाच दिवसात वाहतूक पोलिसांनी पाच हजार ३८० दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेशिस्त दुचाकीस्वारांकडून एक कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादा धुडकाविणे, सिग्नल मोडणे अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांकडून त्वरीत दंड वसूल करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर टप्याटप्याने दुचाकी परत देण्यात येणार आहेत.

या पुढील काळात वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.