scorecardresearch

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळेच कोंडी सुटेल, पुण्यातील कोंडीबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ यांचे मत

पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी केवळ उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारणे हे पर्याय पुरेसे नाहीत.

ranjit gadgil
वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ

संजय जाधव

पुणे : पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी केवळ उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारणे हे पर्याय पुरेसे नाहीत. कोंडी सोडवण्यासाठी खासगी वाहनांना प्रोत्साहन देणे टाळायला हवे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल. असे घडले तरच ही समस्या सुटेल, असे मत ‘परिसर’ संस्थेचे कार्यक्रम संचालक व वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केले.

पुण्यातील कोंडी सोडवण्यासाठी मोठेमोठे पायाभूत सुविधा प्रकल्प शहरात सध्या उभारले जात आहेत. मात्र,त्यामुळे पुण्यातील कोंडीत भरच पडताना दिसत आहे. याबाबत गाडगीळ म्हणाले,की रस्त्यांवरील वाहनांची कोंडी सोडवणे हा राज्यकर्त्यांचा एकमेव हेतू आहे. उड्डाणपूल उभारला की कोंडी कमी होईल, अशी धारणा सरकारी पातळीवर आहे. यातून आपण वैयक्तिक वाहन वापराला प्रोत्साहन देत आहोत, हे सर्व उपाय वरवरचे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. भविष्याचा विचार करता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी त्यांच्यावर जास्त कर आकारता येतील. याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर खासगी वाहनांसाठी जादा पार्किग शुल्क आकारता येईल. दुर्दैवाने याबाबत सरकारी पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लोकांनी जास्तीतजास्त वापर करावा, यासाठी ती सक्षम, परवडण्याजोगी असावी. पुण्यात मेट्रो सुरू झाली असली तरी पीएमपीएमएलच्या बसची संख्या वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकांनी बसचा वापर करावा, यासाठी बसची संख्या वाढवावी लागेल. लोकांना घरातून बाहेर पडल्यानंतर ५ ते ७ मिनिटांत बस थांबा गाठता यायला हवा. याचबरोबर थांब्यावर पोहोचल्यानंतर त्यांना पाच मिनिटांच्या अंतराने बस उपलब्ध व्हायला हव्यात. बस किती वेळात येणार आणि ती सध्या कुठे आहे याची माहिती देणारी ॲप्लिकेशन लोकांसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा असा सक्षम पर्याय आपण दिल्यास निश्चितच रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही गाडगीळ यांनी व्यक्त केला.

एक लाख लोकसंख्यमागे केवळ ३० बस

पुण्याचा विचार करता एक लाख लोकसंख्येमागे पीएमपीएमएलच्या केवळ ३० बस असे प्रमाण आहे. बंगळुरूमध्ये हे प्रमाण ६० बस असे आहे. प्रत्येक बसने दिवसाला सरासरी २०० किलोमीटर अंतर पूर्ण करायला हवे. पुण्याचा विचार करता ते १५० किलोमीटर आहे. याचबरोबर पुण्यातील मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही, असेही गाडगीळ यांनी नमूद केले.

पीएमपीएमलची धाव

एकूण बस – २ हजार ८९

रस्त्यावर धावणाऱ्या – १ हजार ६५४

दररोज बंद पडणाऱ्या बस – ४६

दैनंदिन प्रवासी संख्या – ११ लाख ४३ हजार

दैनंदिन उत्पन्न – १ कोटी ५८ लाख रुपये

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 22:30 IST