पुणे : मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात कोंडी झाली. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. शहरात बहुतांश रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात शुक्रवारी (३० सप्टेंबर) दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तासभर कोसळलेल्या पावसामुळे पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे अनेक चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. झाडे कोसळल्यामुळे रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले. त्यामुळे प्रमुख रस्त्यांलगच्या गल्ली-बोळातून वाहनचालकांनी वाट काढली. शाळा आणि कार्यालये सुटण्याच्या वेळी झालेल्या पावसामुळे नोकरदार तसेच विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, ससून रस्ता, नगर रस्ता, बंडगार्डन रस्त्यावरील वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीसमोर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता.

मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नव्हता. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. सायंकाळी साडेसातनंतर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास दहा मिनिटे मुसळधार पाऊस झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jams across the pune city due to heavy rains pune print news zws
First published on: 30-09-2022 at 22:36 IST