लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गंगाधाम रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्ता दरम्यान ट्रक, ट्रेलर, डंपर अशा जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल (शत्रूंजय मंदिर) ते गंगाधाम चौक, कोंढवा भागातील टिळेकरनगर ते गंगाधाम चौक या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ट्रक, डंपर, सिमेंट वाहतूक करणारे मिक्सर, कंटेनर, ट्रेलर अशा जड वाहनांना सकाळी सात ते रात्री दहा यावेळेत बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले. या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त. येरवडा येथील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा-पुणे : जीव धोक्यात घालून रिल्सचे चित्रीकरण, पोलिसांकडून तरुण-तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल

गंगाधाम रस्त्यावर १२ जून रोजी डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दमयंती भूपेंद्र सोळंखी (वय ५९, रा. गंगाधाम रस्ता) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात सोळंकी यांची दुचाकीस्वार सून प्रियंका राहुल सोळंखी (वय २२) जखमी झाल्या होत्या. गंगाधाम रस्त्यावर गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. गृहप्रकल्पासाठी बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर भरधाव वेगाने जातात. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर यापूर्वी गंगाधाम रस्त्यावर अपघात झाले आहेत. या भागातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले.