पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषी (पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील चौक) चौकात दुमजली उड्डाणपूल आणि हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पोलिसांकडून मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख लांबणीवर पडत आहे. बाणेर, पाषाण, औंध या परिसरात राहणाऱ्या आणि येथून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, विद्यापीठ चौकातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर सुरक्षा अडथळे करण्यास पीएमआरडीएला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर झालेल्या पुम्टाच्या बैठकीत, पोलिसांनी चौकात काम सुरू करण्यास परवानगी द्यावी. पावसाळ्यापूर्वी शक्य असेल, तेवढे काम गतीने कंपनीने मार्गी लावावे असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूने रस्त्यालगत सुरक्षा अडथळे उभारण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पुन्हा पोलिसांकडून हे अडथळे काढण्यात आले. त्यासाठी जी-२० परिषदेचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत दुमजली उड्डाणपुलाचे, तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही, असे पत्र टाटा कंपनीने पीएमआरडीएला, तर पीएमआरडीएने तसे पत्र पुम्टाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. हेही वाचा - पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नाशिक कारागृहात स्थानबद्ध हेही वाचा - खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात करण्यात आलं दाखल उड्डाणपूल प्रकल्पाचा आढावा सन २०२० मध्ये १४ जुलै रोजी गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीबरोबर २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करार करण्यात आला. या करारात ३६ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम वगळता मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पुम्टाच्या बैठकीत उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, अद्यापही चौकात काम सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही.