‘सर्वसमावेशक प्रगती म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणे नाही, तर सर्व क्षेत्रात उत्पादक आणि शाश्वत अर्थपुरवठय़ाचे मार्ग शोधणे आहे. त्यासाठी युवकांमधील कौशल्य विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे मत सिस्कोच्या ‘इन्क्लुजिव्ह ग्रोथ’ विभागाचे अध्यक्ष अरविंद सीतारामन यांनी गुरूवारी व्यक्त केले.
‘सिस्को एज्युकेशन अनेबल्ड डेव्हलपमेंट अॅकॅडमी ’(सीड)ची स्थापना करण्यात आली. या वेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उमा गणेश आदी उपस्थित होते. ‘सीड’तर्फे पश्चिम भारतातील २०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला सीओईपीत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या वेळी सीतारामन म्हणाले, ‘देशात २०३० पर्यंत ४२.३० कोटी युवक रोजगारेच्छुक असतील. त्यामुळे कौशल्य विकास हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी भर देण्याचे क्षेत्र राहणार नाही. देशाच्या सर्वागीण विकासासाठी युवकांच्या कौशल्य विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, सध्या कौशल्य विकासासाठी पारंगत प्रशिक्षक नसल्यामुळे युवकांचे सामथ्र्य वापरले जात नाही.’