पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मुंबईतील ब्रिटिश उच्च उपायुक्त, तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्रे (लो एमिशन झोन्स – एलईझेड) योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीवर आधारित तांत्रिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवारपर्यंत ही कार्यशाळा सुरू असणार आहे. त्यात ट्रान्स्पोर्ट फॉर लंडनचे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. कार्यशाळेमध्ये नियोजन, अंमलबजावणी, जनजागृती, तंत्रज्ञान आणि हितधारक संवाद यांसारख्या बाबींवर सखोल चर्चा होणार आहे.
लंडनमधील अल्ट्रा लो एमिशन झोनच्या (यूएलईझेड) यशस्वी अनुभवावर आधारित ही कार्यशाळा आहे. वायुप्रदूषण मोजणी, जनजागृती मोहिमा, तांत्रिक अंमलबजावणी आणि नागरी सहभाग यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती करणे, माहिती निरीक्षण प्रणाली सक्षम करणे आणि अंमलबजावणीसाठी संस्थात्मक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.
महापालिकेच्या लो एमिशन मोबिलिटी झोन धोरणानुसार २०२६ पर्यंत निवडक भागांमध्ये केवळ बीएस-सिक्स, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्यास परवानगी देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाची एकत्रित शहरी विकासाशी सांगड घालणे, नॉनमोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा समावेश करणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांशी सुसंगत प्रथम व शेवटच्या टप्प्यांपर्यंत प्रभावी संलग्न करणे यावर चर्चा होणार आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाययोजनांसाठी व्यापक प्रणाली महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येत आहे. यासाठी ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तांत्रिक सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तज्ज्ञांकडून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनामुळे शहरातील कमी प्रदूषण क्षेत्रे प्रभावीपणे निश्चित करून त्या दृष्टीने नियोजन करणे शक्य होईल.- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका