महापालिकेतील सुरक्षा रक्षक आणि रखवालदारांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार होत असून रखवालदारांच्या बदल्या मुद्दाम केल्या जातात आणि सात ते आठ हजार रुपये घेऊन त्या रद्द केल्या जातात. ‘बदली हवी, तर सात हजार रुपये घेऊन गिरीमामांना भेटा,’ असे उघड सांगितले जाते, असा थेट आरोप बुधवारी पालिका अधिकाऱ्यांवर करण्यात आला.
सुरक्षा रक्षक आणि रखवालदारांच्या बदल्यांसंबंधीचा प्रश्न सभेत अविनाश बागवे यांनी उपस्थित केला होता. रखवालदारांच्या दर महिन्याला बदल्या केल्या जातात आणि देवघेव झाली, की त्या रद्दही होतात, हा काय प्रकार आहे, असा थेट प्रश्न बागवे यांनी उपस्थित केला. एका महापालिका अधिकाऱ्याच्या गाडीवर चालक असलेला गिरी नावाचा कर्मचारी बदली रद्द करण्यासाठी सात हजार रुपये घेतो आणि या प्रकाराची लेखी तक्रार रखवालदारांनीही केली आहे. तरीही काही कारवाई होत नाही, असे बागवे म्हणाले.
या तक्रारींबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी निवेदन केले. त्या चालकाबद्दल तक्रार आली आहे. त्याची बदली करायला सांगितले आहे. बदली झाली की नाही याची मी खात्री करून घेतो, असे जगताप यांनी सांगताच बागवे यांनी या निवेदनावर तीव्र हरकत घेत एक कर्मचारी उघड उघड बदल्यांसाठी पैसे घेत आहे आणि ते पैसे अधिकाऱ्यांना देतो असे तो सांगतो. तरीही तुम्ही माहिती करून घेतो इथपर्यंतच कारवाई करत आहात, ही गंभीर बाब आहे. सर्वसामान्य सेवकांना छळण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. तेव्हा काहीतरी कारवाई करा, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.