पुणे : बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून एका फिरस्त्याने सात पिस्तुले चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. पिस्तूल चोरल्यानंतर कचरा वेचकाने पोलीस ठाण्यासमाेर एकाला पिस्तुलाचा धाक दाखविला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली.
राकेशकुमार संजयकुमार चिटेकर (मूळ रा. कलबर्गी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे साधू वासवानी चौकातील एका इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. तेथे नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. विविध गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल कक्षाचे स्थलांतर बंडगार्डन पोलिसांनी शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात स्थलांतर केले आहे. आरोपी चिटेकर हा फिरस्ता आहे. तो पुणे स्टेशन परिसरात कचरा वेचतो. त्याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी बाराच्या सुमारास तो कचरा वेचत होता. मध्यवर्ती शासकीय इमारत परिसरातील मुद्देमाल कक्षाजवळ तो आला. मुद्देमाल कक्षाचा पाठीमागील दरवाजा उचकटून आत गेला. पोलिसांनी मुद्देमाल कक्षात जप्त केलेल्या बिअरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. मुद्देमाल कक्षातील बिअर बाटल्यातील बिअर त्याने प्याली. बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यांतील पिस्तुले पोलिसंनी जप्त करुन मुद्देमाल कक्षात ठेवली होती. चिटेकर याने सात पिस्तुले चाेरली.
दिवसभर पिशवीत पिस्तुले घेऊन तो फिरत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास तो नशेत साधू वासवानी चौकात फिरत फिरत आला. साधू वासवानी चौकातील एका इमारतीत बंडगार्डन पोलीस ठाणे आहे. तेथून जात असलेल्या एकाला चिटेकर याने अडवले आणि ‘हँडस अप’ असे म्हणाला. चिटेकर याने त्याच्यावर चोरलेले पिस्तुल रोखले. त्यानंतर घाबरलेल्या एकाने समोर असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. चिटेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेण्यात आल्यानंतर तपासणी केली. तेव्हा त्यावरील जप्त मुद्देमालाचा पोलिसांचा शिक्का होतात.
चौकशीत चिटेकर याने मुद्देमाल कक्षातून सात पिस्तुले चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी उर्वरित सहा पिस्तुलांबाबत चौकशी केली. तेव्हा पिस्तुले एका पिशवीत ठेवली असून, झुडपात लपविल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन झुडपात ठेवलेली पिस्तुलांची पिशवी जप्त केली. त्यात सहा पिस्तुले आढळून आली. जप्त केलेली पिस्तुले सापडल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चिटेकरविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
