पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून येत्या काही महिन्यात मेट्रोची प्रत्यक्ष सेवा सुरु होणार आहे. महामेट्रोने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे प्रवाशांना सायकल सहित मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकाराम नगर स्थानक आणि संत तुकाराम नगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला.

या प्रवासादरम्यान मेट्रोचे अधिकारी सायकल लिफ्टद्वारे फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या फलाटावर घेऊन गेले, तेथून मेट्रो ट्रेनमध्ये सायकलसहित प्रवेश केला. मेट्रो ट्रेन तेथून संत तुकाराम नगर स्थानकावर पोहचली. संत तुकाराम नगर स्थानकाच्या लिफ्टचा वापर करून सर्व सायकलसहित स्थानकाच्या बाहेर आले. त्यानंतर सर्व अधिकारी सायकलद्वारे ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानात गेले. आणि तेथून परत येऊन संत तुकाराम नगर स्थानक येथून मेट्रो ट्रेनद्वारे पुन्हा फुगेवाडी स्थानकात सायकलसहित आले. सायकल आणि मेट्रोचा वापर करून विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, महिला वर्ग, सेल्समन, वस्तूचे घरोघरी वितरण करणारे कर्मचारी इ. काम करणारे नागरिक सहजतेने मेट्रोचा वापर करू शकतात.

स्वतंत्र ‘नारीशक्ती’ डबा

मेट्रो ही एक अत्यंत सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवास माध्यम आहे. मेट्रोमध्ये महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र ‘नारीशक्ती’ डबा ठेवण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रो कोचमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. त्यामुळे मेट्रोची सर्व स्थानके आणि डबे कायम निगराणीखाली असल्याने कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसण्यास मदत होणार आहे.

दोन वेगवेगळ्या प्रवास सुविधांचे एकत्रीकरण

पुणे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून नावारूपास आले होते. परंतु, मधल्या काळात शहरात वाहतुकीसाठी सशक्त पर्याय नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत खूप वेगाने वाढ झाली. त्यामुळे प्रदूषण वाढले, आणि प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात वाढ होत गेली. येऊ घातलेल्या महामेट्रोने सायकलला प्रोत्साहन देण्याचे ठरविल्याने पुणे पुन्हा आपल्या जुन्या वैभवाप्रमाणे ‘सायकलींचे शहर’ म्हणून नावारूपास येण्यासाठी मदत होणार आहे. सायकलींचा वापर करून मेट्रो प्रवास करणे शक्य असल्यामुळे फर्स्ट आणि लास्ट मिले काँनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या प्रवास सुविधांचे एकत्रीकरण होणार आहे.

हेही वाचा- पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार; कर्मचारी जखमी

पुणेकरांना अत्यंत मोलाची मदत

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचलक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, “सायकल हे एक पर्यावरण पूरक प्रवास माध्यम असून मेट्रो ट्रेनमध्ये सायकल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्यामुळे असंख्य पुणेकरांना अत्यंत मोलाची मदत होणार आहे. मेट्रो कोचमध्ये सायकल स्वरांसाठी योग्य ते सूचना फलक आणि मार्गदर्शक फलक उपलब्ध करून देण्यात येतील. मला आशा आहे की पुणेकर या सेवेचा पूर्ण क्षमतेने वापर करतील.”