पुणे : महापालिकेच्या विठ्ठलवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (एसटीपी) तळजाई वन क्षेत्रासाठी प्रक्रिया केलेले पाणी पुरवले जाणार आहे. महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव वन विभागाला पाठविला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे २५७ हेक्टर क्षेत्रावर तळजाई वन क्षेत्राचा परिसर आहे. तळजाई टेकडीवरील वृक्ष संवर्धनासाठी महापालिकेच्या विठ्ठलवाडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी वापरता येईल, असा प्रस्ताव महापालिकेने वन विभागाला दिला होता. सध्या या क्षेत्रासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वाहिनीतील व्हॉल्व्हद्वारे वन विभागाला पिण्याचे पाणी पुरवले जाते. मात्र, वृक्षारोपणासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्यासाठी महापालिकेने हे प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासन आणि वन विभाग वनीकरणासाठी एकत्रितपणे अनेक उपक्रम राबवितात. तळजाईसह पाचगाव पर्वती वन क्षेत्रासाठी दररोज किती पाण्याची गरज आहे आणि कोणत्या ठिकाणी पाणी पोहोचवायचे, याबाबत वन विभागाकडून महापालिकेने माहिती मागविली होती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली होती. वन विभागाने दाखविलेल्या तयारीमुळे उन्हाळ्याच्या काळात तळजाई टेकडीवरील झाडांना पाण्याचा पुरवठा होणार असल्याने येथील हिरवाई टिकवून राहण्यास मदत होणार आहे.
महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पाणी कोठे न्यायचे, जलवाहिन्या कशा टाकायच्या, याचा आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे. पाणी उचलण्यासाठी पंपदेखील लावावा लागणार आहे.- मनीषा शेकटकर,विद्युत विभागप्रमुख, पुणे महापालिका