पुणे : जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या हद्दीस लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी गिर्यारोहण करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२७ मार्च) रोजी घडली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर अंतरिम अहवालात मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने खोल दरीत पडून मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एच३ एन२’मुळे वृद्धेचा मृत्यू; मृतांची संख्या दोन; करोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ अजय बबनराव काळे (वय ६२, रा. बी/४०२ नीलकंठ गार्डन सोसायटी, जुने पनवेल जिल्हा रायगड) असे या ज्येष्ठ गिर्यारोहकाचे नाव आहे. याबाबत मुलगा आशुतोष काळे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यामध्ये जबाब दिला आहे. अजय काळे यांना गिर्यारोहणाची आवड असल्याने त्यांनी अनेक लहान-मोठ्या मोहिमा केल्या होत्या. रविवारी (२६ मार्च) सह्याद्री ॲडव्हेंचर इन्स्टिटय़ूटमधील मित्रांसोबत घरातून निघाल्यानंतर सोमवारी (२७ मार्च) सकाळी किल्ले लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. लिंगाणा किल्ला हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आहे. परंतु, किल्ल्याकडे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून सिंगापूरमार्गे रस्ता आहे. काळे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या हातात असलेले स्मार्ट वॉच त्यांचे बिघडलेले ह्रदयाचे ठोके आणि रक्तदाब दाखवत होते. परंतु, दुर्गम मार्ग असल्याने कोणतीच साधने उपलब्ध नव्हती सोबत असलेल्या वैद्यकीय संचाद्वारे उपचार करणे मुश्किल होते. यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सोबत असलेल्या मित्रांनी दिली. मात्र, स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळे हे खोल दरीत कोसळल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.