चंद्रपूरमधील आदिवासी गावाचा धाडसी निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विडय़ा वळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेंदुपत्त्याच्या खुडणीचा हंगाम ऐन भरात असताना एका छोटय़ाशा आदिवासी गावाने मात्र त्याचे उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेंदुपत्त्याची अति तोड झाल्यामुळे झाडे खुरटतात आणि त्याला फळेही धरत नाहीत. त्यामुळे पानतोड थांबवल्यास झाडे वाढतील आणि आमची मुले टेंभुर्णीची फळे खातील, असा सुज्ञ विचार या गावाने रुजवला आहे. विशेष म्हणजे या भागात काम करणाऱ्या अभ्यासकांच्या एका गटाने टेंभुर्णी फळांमधील पोषणमूल्यांची पुण्यातील एका प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली असून त्यात ‘अ’ जीवनसत्त्व, झिंक व मॅग्नेशियम यांचे चांगले प्रमाण असल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोठारी तालुक्यात असलेल्या पाचगावची ही गोष्ट आहे. या गावात ६० घरे असून लोकसंख्या केवळ २५० इतकी आहे.परंतु वन हक्क कायद्याअंतर्गत या गावास हक्क मिळाले असून त्यांच्याकडे आजूबाजूच्या भागातील १ हजार हेक्टरचे मिश्र वन आहे. या परिसरात प्रति हेक्टर ४० वृक्ष याप्रमाणे जवळपास ४० हजार तेंदुपत्ता वृक्ष आहेत. तेंदू पाने एप्रिलच्या सुरुवातीला येतात. या हंगामात आदिवासींना त्यातून चांगले उत्पन्नही मिळते. एका तेंदू झाडापासून ५० ते १०० किलो टेंभुर्णी फळे मिळतात. काहीशी अगोड चिकूसारखी लागणारी ही फळे स्थानिक आवडीने खातात, तसेच साले काढून फळे वाळवून साठवून ठेवली जातात. पूर्वी वाळलेल्या फळांची भुकटी करून लहान मुलांना दुधातून दिली जात असे. बिडी वळण्यासाठी तेंदूपत्ता तोड होऊ लागल्यानंतर झाडांची वाढ खुंटत गेली आणि फळांचे उत्पादन कमी होऊ लागले.

चंद्रपूरचे रहिवासी व अभ्यासक विजय एदलाबादकर म्हणाले, ‘‘स्थानिक ग्रामसभा प्रभावी असून वनापासून त्यांना बांबू हे प्रमुख उत्पन्न मिळते. तेंदुपत्त्यामुळेही चांगले उत्पन्न होत असले तरी पानतोडीमुळे खाद्यान्न व झाडेही कमी होतात हे पाहून त्यांनी गेल्या वर्षी व या वर्षीही पानतोड केली नाही. झाडे वाढू लागल्याचे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे तत्कालिक आर्थिक नुकसान असूनही ते निर्णयावर ठाम आहेत. स्वत:च्या क्षेत्रात पानतोड होऊ नये म्हणून टेहळणी पथकेही तयार केली आहेत.’’

जन विज्ञान केंद्रातर्फे ही फळे पोषणमूल्यांसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत तपासून घेण्यात आली. गडचिरोली येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या विश्वस्त व क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट डॉ. मीना शेलगावकर म्हणाल्या, ‘‘या फळांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, झिंक व मॅग्नेशियम यांचे प्रमाण चांगले आहे. मुले व मातांना आहारातून खनिजे, जीवनसत्त्वे व सूक्ष्म पोषणद्रव्ये कमी प्रमाणात का होईना, पण रोज मिळाली, तर त्यांना कुपोषण टाळण्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. टेंभुर्णीची फळे काही प्रमाणात ही गरज भागवू शकतील.’’

‘‘वनाधिकार मिळाल्यावर लोक जंगलाचे नुकसान टाळून संवर्धन करत आहेत, हे एक सुचिन्ह आहे. याच गावाने स्वत:ची देवराई चांगल्या प्रकारे राखली असून नवीन देवरायाही ते निर्माण करत आहेत.’’

– डॉ. माधव गाडगीळ, पर्यावरणतज्ज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal village in chandrapur decided not to produce tendu leaf
First published on: 26-04-2017 at 03:49 IST