पुण्याहून दापोली परिसरात सहलीसाठी गेलेल्या सहा जणांचा आंजर्ले परिसरात रविवारी सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. तिघांना स्थानिक नागरिकांनी वाचविले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकमेकांचे नातलग असून, त्यात तीन बालकांचा व दोन महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चौघे जण दत्तवाडी भागात राहणाऱ्या डांगी कुटुंबातील आहेत.
पवन डांगी (वय ६), श्रुती डांगी (वय १३), श्याम डांगी (वय २७), सविता डांगी (वय २४, सर्व रा. पान मळा, दत्तवाडी), संगीता ओझा (वय ३५ रा. अरण्येश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. अर्पण शर्मा (वय ८) हा बालकही बुडाला असून, त्याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. श्याम डांगी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा या घटनेत मृत्यू झाला. मृतांमधील संगीता ओझा या श्याम डांगी यांची बहीण, तर अर्पण शर्मा हा त्यांच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा होता.
 सर्व नातलग मीनी बसमधून कोकण भागामध्ये सहलीसाठी गेले होते. दापोलीपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजर्ले भागामध्ये आंजल्र्याच्या खाडीजवळ अडखळ पुलाच्या परिसरात नऊ जण समुद्रातील पाण्याची मजा घेण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते समुद्रात आतमध्ये ओढले गेले. काही कळण्यापूर्वीच सर्व जण खोल पाण्यात गेले. हे सर्व जण बुडत असल्याने काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ तिघांनाच ते वाचवू शकले.
घटनेबाबत रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत सांगितले की, संबंधित पर्यटक समुद्रात उतरलेला भाग पर्यटनासाठी नाही. आंजर्ले खाडी व समुद्र या ठिकाणी एकत्र मिळतात. त्यामुळे हा भाग पाण्यात उतरण्यासाठी धोकादायक आहे.
व्यापारी कुटुंबांवर घाला
समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेले सर्व जण व्यापारी कुटुंबातील आहेत. डांगी यांचे दत्तवाडी भागात किराणा मालाचे दुकान आहे. त्याचप्रमाणे ओझा यांचे अरण्येश्वर भागामध्ये अरण्येश्वर मिनी मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. दोन ते तीन दिवस दुकान बंद ठेवून हे सर्व जण सहलीसाठी गेले होते. दुपारी या घटनेची माहिती पुण्यातील नातलगांना कळली. त्यामुळे ते राहत असलेल्या भागामध्ये शोककळा पसरली. किराणा मालाचे दुकान असल्याने हे कुटुंबीय त्यांच्या भागामध्ये चांगल्या ओळखीचे होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातलगांसह मित्रमंडळींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत सर्वाचे मृतदेह पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.