पुणे : नगर रस्त्यावरील रांजणगाव परिसरात महिलेसह दोन मुलांच्या झालेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. खून प्रकरणात पसार झालेल्या आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली. अनैतिक संबंधांतून महिलेसह तिच्या मुलांचा खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.
याप्रकरणी गोरख पोपट बोखारे (वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली. तपासासाठी बोखारेला ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड), तिची मुले स्वराज (वय ३) आणि विराज (वय १) अशी खून झालेल्यांची नावे आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
तिघांचे मृतदेह रांजणगाव परिसरातील खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २५ मे रोजी सापडले होते. मृतदेह जाळण्यात आले होते. त्यामुळे ओळख पटविण्यात अडचण आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांची पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठविण्यात आली होती. गावातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली होती. स्वातीच्या हातावर गोंदविले होते. ज्या भागात मृतदेह सापडले होते, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या हाती काही धागेदाेरे लागले नव्हते.
गेले दहा दिवस पोलिसांकडून अहोरात्र तपास करण्यात येत होता. तपासात बीड जिल्ह्यातील स्वाती सोनवणे ही मुलांसह बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह आणि स्वातीच्या वर्णनात साम्य आढळले. स्वातीच्या पतीची चौकशी करण्यात आली, तेव्हा स्वातीशी वाद झाल्याने ती आळंदीला माहेरी गेल्याची माहिती तिच्या पतीने तपासात दिली. स्वातीच्या आई-वडिलांची चौकशी करण्यात आली, तेव्हा स्वाती ही बहिणीचा दीर गोरख बोखारे याच्यासोबत २३ मे रोजी दुचाकीवरून गेली, तेव्हापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नगर रस्त्यावरील सरदवाडीमधून गोरखला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो एका खासगी कंपनीत मोटारचालक म्हणून काम करतो. त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने स्वाती आणि तिच्या मुलांचा खून केल्याची कबुली दिली.
स्वाती आणि पतीची भांडणे व्हायची. गोरख भांडणात मध्यस्थी करायचा. स्वाती आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. स्वातीने त्याला विवाहासाठी तगादा लावला होता. त्यामुळे गोरख तिच्यावर चिडला होता. घरी नेण्याच्या बहाण्याने गोरखने २३ मे रोजी स्वाती आणि मुलांना दुचाकीवरून नेले. वाटेत त्याने एका पेट्रोलपंपावरून बाटलीत पेट्रोल घेतले. त्यानंतर त्याने रस्त्यात आडबाजूला नेऊन स्वाती आणि तिच्या मुलांचा गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून त्यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच पेट्रोल टाकून तिघांचे मृतदेह जाळले. मात्र, त्या वेळी पाऊस पडल्याने मृतदेह अर्धवट जळाले.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, विश्वास जाधव, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, नीळकंठ तिडके, अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे आणि पथकाने ही कारवाई केली.
साडेसोळा हजार जणांची चौकशी
‘तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावरील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. या प्रकरणात साडेसोळा हजार जणांची चौकशी केली. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके पाठविण्यात आली होती. रांजणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र तपास करून गुन्हा उघडकीस आणला,’ असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.