राज्यातील उद्योगाचे केंद्रस्थान म्हणून पुणे जिल्ह्याचे नाव घेतले जाते. पुण्याला माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग केंद्र अशी ओळख असून, उत्पादन क्षेत्राचा विस्तारही मोठा आहे. मागील काही काळापासून उद्योग आणि गुंतवणुकीच्या बाबतीत पुण्याचे नाव वेगळ्याच कारणांनी पुढे येऊ लागले आहे. वेदांत- फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प पुण्यातील रांजणगाव येथे होणार, अशा हालचाली सुरू होत्या. अचानक हा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला. यामुळे राजकीय गदारोळ सुरू झाला. अखेर हा प्रकल्प कुठेच झाला नाही, हा भाग निराळा. मात्र, जागतिक पातळीवरील कंपन्या कार्यरत असलेल्या पुण्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. याला कारण आहे पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था.

पुणे जिल्ह्यात अनेक औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेच आयटी पार्क हा सर्वतोमुखी झालेला आहे. या पार्कमध्ये बहुराष्ट्रीय आणि देशातील मोठ्या आयटी कंपन्या आहेत. या आयटी पार्कचा विचार करता १३९ कंपन्या असून, सुमारे सव्वादोन लाख कर्मचारी तेथे काम करतात. अतिशय गौरवाने या आयटी पार्ककडे पुणेकर बोट दाखवितात. मात्र आता तेथील पायाभूत सुविधांची बोंब समोर येऊ लागली आहे. पार्कचा विस्तार झाला, पण रस्ते तेवढेच राहिले. सांडपाणी वाहिन्या पुरेशा नाहीत, कचरा उचलण्याची योग्य व्यवस्था नाही आणि नित्याची वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न या पार्कमध्ये आहेत.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस पुत्राचा ‘कार’नामा; कारची महिलेला जोरात धडक

गेल्या १० वर्षांत आयटी पार्कमधून पायाभूत सुविधा पुरेशा नसल्याने ३७ कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने केला. त्यानंतर याबाबत चर्चा सुरू होऊन त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांवर बोलण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात समाधान मानण्यात आले. यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा फेटाळला. स्थलांतरित झालेल्या कंपन्यांची यादी द्या, अशी मागणीही एमआयडीसीने असोसिएशनकडे केली. असोसिएशनने याला नकार दिल्याने खरे चित्र समोर येण्याऐवजी याबाबत वेगळ्याच चर्चा सगळीकडे पसरू लागल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे जाहीर केले. ही बैठक होण्यास अद्यापही मुहूर्त उजाडलेला नाही.

आयटी पार्कचा गदारोळ सुरू असताना चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना महावितरणचा शॉक बसत असल्याची बाब समोर आली. या वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. उन्हाळ्यात हे प्रकार खूपच वाढले. यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन ठप्प होऊन त्यांना आर्थिक फटका बसू लागला. यावर चाकण इंडस्ट्रियल असोसिएशनने ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अखेर ओरड झाल्यानंतर ‘महावितरण’ने या समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-जुन्या मोटारींना पुणेकरांची पसंती! सर्वाधिक मागणी कोणत्या मोटारींना जाणून घ्या…

देशात उद्योगांसाठी विजेचा सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहे. उद्योगांकडून वारंवार याची तक्रार केली जाते. आम्ही सुविधाही तेवढ्या देत असल्याने हा दर योग्य असल्याची भूमिका ‘महावितरण’कडून घेतली जाते. इतर राज्ये उद्योगांना अधिकाधिक सवलती देत असताना राज्यातील उद्योगांना देशात सर्वाधिक दराने वीज देण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे अनेक उद्योग नाराजी व्यक्त करीत आहेत. हा दर कमी करण्याची वारंवार मागणी त्यांच्याकडून होत आहे. उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रतिकूल स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या चित्रात सुधारणा न झाल्यास आगामी काळात कंपन्या पुण्याकडे वळण्याचा विचार करतील की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
sanjay.jadhav@expressindia.com