मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. दरी पुलावर अवजड ट्रक (ट्रेलर) उलटून चालकासह दोघे जण जखमी झाले. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या ट्रकचालकाची अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर तेथून निघालेल्या दुचाकीस्वाराने ट्रकचालकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक ट्रकने पेट घेतल्याने दुचाकीस्वाराने दरीत उडी मारली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरीत पडलेल्या दुचाकीस्वाराची सुटका केली.
बाह्यवळण मार्गावर दरी पुलावर मध्यरात्री अवजड ट्रक उलटून अपघात झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्राला मिळाली. त्यानंतर या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. केबिनमध्ये ट्रकचालक अडकला होता. जखमी अवस्थेतील ट्रक चालकाला जवानांनी धीर दिला. जवान शिवाजी मुजुमले आणि शिवाजी आटोळे यांनी कटरचा वापर करुन केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.
दरम्यान, ट्रकचा अपघात झाल्यानंतर तेथून निघालेल्या दुचाकीस्वाराने ट्रकचालकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचा काही भाग पेटल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. त्याने दरीपुलावरुन उडी मारली. दरीत दुचाकीस्वार पडला होता. त्याचा आवाज ऐकून जवानांनी त्याला दरीतून बाहेर काढले. जखमी अवस्थेतील ट्रकचालक आणि दुचाकीस्वारास पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकमधील डिझेल सांडल्याने दरी पूल परिसरातील रस्ता निसरडा झाला होता. जवानांनी माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, ज्ञानेश्वर बाठे, शिवाजी मुजुमले, शिवाजी आटोळे, दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.