पुणे : देशातील नागरिकांना २०२५ मध्ये ४ हजार कोटींहून अधिक स्पॅम कॉल आले. यातील १ हजार १८९ कोटी अनावश्यक कॉल्स वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांची फसवणूक आणि वेळेचा अपव्यय टाळण्यास मदत झाली, अशी माहिती ट्रूकॉलरच्या अहवालातून समोर आली आहे.

देशात १०० कोटींहून अधिक मोबाइल वापरकर्ते आहेत. ‘ट्रूकॉलर’ने स्पॅम आणि फसवणुकीच्या प्रकारांबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात विदाआधारित विश्लेषणाद्वारे स्पॅम व फसवणूक प्रकार देशातील संवाद प्रणालीवर कसा परिणाम करतात आणि तंत्रज्ञानाद्वारे दररोज कोट्यवधी नागरिकांचे होणारे संरक्षण या बाबी मांडण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार, ‘ट्रूकॉलर’ने २०२५ मध्ये देशात ४ हजार १६८ कोटी स्पॅम कॉलची ओळख पटवली. त्यापैकी १ हजार १८९ कोटी कॉल वापरकर्त्यांनी ब्लॉक केले. तसेच, बँका, सरकारी संस्था आणि नामांकित नाममुद्रांची (ब्रँड) नक्कल करून करण्यात आलेले ७७० कोटी फसवे कॉल शोधण्यात आले. गेल्या वर्षभरात १२ हजार ९०३ कोटी स्पॅम लघुसंदेश (एसएमएस) ओळखले गेले. त्यांची संख्या वर्षाच्या उत्तरार्धात लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले.

‘ट्रूकॉलर’कडून स्पॅम कॉल रोखण्यासाठी ‘कम्युनिटी रिपोर्टिंग’च्या माध्यमातून वापरकर्त्यांची मदत घेतली जात आहे. या माध्यमातून १ हजार १८९ कोटी स्पॅम कॉल वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात यश आले. एका कॉलचा सरासरी कालावधी १.८ मिनिटे असून, स्पॅम कॉल रोखल्याने भारतीयांचा दररोज सुमारे २१.७ लाख तास आणि दर आठवड्याला १.५ कोटी तासांहून अधिक वेळ वाचला. स्पॅम कॉल रोखल्यामुळे वापरकर्त्यांची एकाग्रता कायम ठेवण्यासह अनावश्यक कॉलमुळे येणारा ताण कमी करण्यास मदत झाली आहे. याचबरोबर घाईघाईत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून त्यांचे संरक्षण झाले आहे, असे अहवालात म्हटले आहे.


२०२५ मधील स्पॅम कॉलचा वाढता त्रास

एकूण स्पॅम कॉल – ४१६८ कोटी
रोखलेले स्पॅम कॉल – ११८९ कोटी

स्पॅम कॉलचा सरासरी कालावधी – १.८ मिनिटे


२०२६ मध्ये धोका कशापासून?

  • ओळख पडताळणीच्या नावाखाली होणारी फसवणूक
  • सरकारी संस्थांच्या संकेतस्थळांची नक्कल
  • कॉल, संदेश आधारित बहुस्तरीय स्कॅम
  • एआय-निर्मित व्हॉइस संदेश

ऑनलाइन फसवणूक ही केवळ तांत्रिक समस्या नाही, तर मानवी वर्तनाशी निगडित समस्या आहे. फसवणूक करणारे वापरकर्त्याची भीती, घाई आणि अनिश्चितता यांचा फायदा घेतात. वापरकर्त्यांनी सतर्क राहण्यासोबत तातडीच्या विनंत्यांची पडताळणी न करणे आणि संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण न करणे यावर भर द्यावा. रिशित झुनझुनवाला, मुख्याधिकारी, ट्रूकॉलर